Video: 11 वर्षांचा छकुला! अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी दात कामाला आले, कसे? वाचा

| Updated on: Nov 30, 2022 | 12:38 PM

11 वर्षांचा आरव सायकलवरुन गेला, वाटेत लबाडांनी घेरलं, त्याचे कपडे उतरवले आणि गाडीत टाकून....

Video: 11 वर्षांचा छकुला! अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी दात कामाला आले, कसे? वाचा
थरारक घटना
Image Credit source: Social Media
Follow us on

गाझियाबाद : 11 वर्षांच्या एका चिमुरड्याचं (Ghaziabad Kidnapping) अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी त्याला फुटलेल्या काचेची भीती घालत धमकावलं. त्याचे कपडे उतरवले आणि त्याला गाडीत कोंडलं. पण या मुलाने मोठ्या हिंमतीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. त्यासाठी या मुलाने स्वतःच्या दातांची मदत घेतली आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून त्याने पळ काढला. शनिवारी गाझियाबाद (Ghaziabad News) येथील मुरादनगर (Muradnagar) परिसरात मुलाच्या अपहरणाची ही घटना समोर आली होती.

एका व्यापाऱ्याच्या 11 वर्षांच्या मुलाचं मुरादनगर येथील एका फॅक्टरी बाहेरुन अपहरण झालं होतं. या मुलाचं नाव आरव असं आहे. तर वडिलांचं नाव धमेंद्र आहे.

आरव शनिवारी सायकलवर रेल्वे रोड येथे गेला होता. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी त्याला घेरलं. त्याला फुटलेल्या काचेचा धाक दाखवून कपडे काढण्यास भाग पाडलं. नंतर अपहरणकर्त्यांनी त्याला धमकावून गाडीत कोंडलं.

अपहरणकर्त्यांच्या धमकीला आरवही प्रचंड घाबरला होता. अपहरणकर्त्यांनी त्याची सायकलदेखील फेकून दिली होती. यानंतर गाडीतून आरवला घेऊन ते सुसाट निघाले होते.

पाहा व्हिडीओ :

एकूण चार अपहरणकर्ते आरवसोबत होते. वाटेत अपहरणकर्त्यांनी गाडी मुरादनगर येथील पैदा नावाच्या गावाजवळ थांबवली. त्यावेळी एकाचा फोन आला. अपहरणकर्त्याला आलेल्या फोनने काहीचं लक्ष आरवपासून हटलं आणि तितक्यात आरवने हिंमत दाखवली.

आरव याने अपहरणकर्त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला. आरव चावल्याने अपहरणकर्ता कळवळला. पण पुन्हा भानावर येईपर्यंत उशीर झाला होता. आरव अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळाला आणि 2 किलोमीटर दूर असलेल्या थेट आपल्या घरी येऊन थांबला.

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून जेव्हा आरव घरी आला, तेव्हा त्याने घरातल्यांना घडलेला किस्सा सांगितला. त्याचे कुटुंबीय आरवने सांगितलेला प्रकार ऐकून हादरुनच गेले. याप्रकरणी आता आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांनीही माहिती दिलीय. पोलीस सीसीटीव्ही फुटेजही पाहणी आता करत असून अपहरणकर्त्यांचा शोधही घेतला जातोय. अद्याप आरोपींचा शोध लागला नसून पुढील तपास केला जातोय.