लखनऊ : आताच देशभर होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा झाला. लहानापासून मोठ्यांनीही या सणाचा आनंद घेतला. मात्र एक बातमी समोर आली ज्याने सणाच्याच दिवशी एका कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवरा बायको दोघेही होळी खेळून घरी गेले आणि अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला. दीपक गोयल आणि शिल्पी असं मृत पती-पत्नीचं नाव आहे.
उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमधील मुरादनगर अग्रसेन मार्केट भागातील ही घटना आहे. बुधवारी पती-पत्नी होळी खेळले आणि दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यानंतर दोघेही बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले. अंघोळीला गेल्यावर जवळपास ते तासभर बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांची दोन लहान मुले त्यांना आवाज देऊ लागलीत. मात्र त्यांना आतून कोणताही आवाज न आल्याने ते घाबरून गेले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला.
घरातील दोन्ही लहान मुलं का ओरडू लागलीत म्हणून शेजारी जमा झाले. लहान मुलांनी आई आणि वडील आत असून बाहेर आले नसल्याचं सांगितलं. त्यानंतर शेजारच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडल्यावर आत पाहिलं तर काय पती आणि पत्नी बेशुद्धावस्थेत पडले होते. दोघांनाही बाहेर काढण्यात आलं.
दरम्यान, लगोलग रूग्णवाहिकेला बोलावून त्यांना गाझियाबाद इथल्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दोघांना तपासल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. दोघांचा बाथरूममधील गिझरचा गॅस लिक झाल्याने गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर दोघांच्या मृत्यूच्या मागचं कारण स्पष्ट होणार आहे.