पुरोगामी महाराष्ट्र महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराने हादरून गेला आहे. बदलापूर येथे दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसले. रोज अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर झाला आहे. दिवसाढवळ्या पोरीबाळींवर अत्याचार होत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिवसा तालुक्यामधील सरपंचाच्या मुलाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीवर अत्याचार केला आहे.
दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला एका युवकाने मार्डीच्या जंगलात नेले आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली. आरोपी हा सरपंचाचा मुलगा आहे.
पीडिता ही अमरावती येथील शाळेत नववीमध्ये शिकत आहे. दररोज एसटी बसने ये-जा करते. शनिवारी सायंकाळी ती स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती. याचदरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्राने गावाच्या वाटेवर तिला हेरले. त्याने तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला तेव्हा विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला त्यानंतर तिने मोबाईलवरून कुटुंबीयांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली. मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली. तो तिला गावाच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी आरोपी सरपंचाच्या मुलाला अटक केली आहे.
दरम्यान, बदलापूर येथील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अत्याचाराची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. निवडणुकांआधी महिला सुरक्षेसंदर्भात राजकीय नेते मंडळी आश्वासने देतात ती आता पोकळ असल्याचं या समोर येणाऱ्या घटनांवरून दिसत आहे. नराधमांना कसलाही धाक राहिलेला नाही, मनाला येईल त्या महिला आणि मुलींवर हात टाकायला हे धजावत नाहीयेत. आता वेळ आली आहे की सरकारने अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यायल हवी.