Crime news : गाझियाबादमध्ये एका तरुणीने प्रियकराच्या बहिणीचा गळा चिरून गुन्हा (knife attack) करून घटनास्थळावरून पळ काढला. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या ती जीवन-मरणाची लढाई लढत आहे. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून हल्ला करणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला आहे.
गाझियाबादच्या कवी नगर पोलीस स्टेशन परिसरातील गोविंदपुरम येथील ही घटना आहे. सविता ही 30 वर्षीय महिला गोविंदपुरम भागात पती आणि मुलासोबत भाड्याच्या घरात राहते. सविताचा भाऊ यशचे दिल्लीतील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाची माहिती सवितालाही होती.
यशची विवाहीत प्रेयसी त्याच्यासोबत अनेकदा सविताच्या घरीही आली होती. मात्र गेल्या काही काळापासून त्या दोघांमधील संबंध ठीक नव्हते. तसेच ती महिला विवाहीत असल्याने तिच्याशी प्रेमसंबंध ठेवू नयेत असे त्याच्या घरच्यांनी त्याला समजावले होते. त्यामुळे यशला तिच्यापासून वेगळे व्हायचे होते. त्यामुळे तो तिच्यापासून लांब रहात होता. गेल्या शुक्रवारी यशची प्रेयसी त्याला भेटण्यासाठी त्याची बहीण सविताच्या घरी पोहोचली. मात्र तिथे त्यांनी तिला यशला भेटू दिले नाही व याच मुद्यावरून त्या दोघींचा वाद झाला. त्यानंतर यशच्या प्रेयसीने रागाच्या भरात सवितावर घरात ठेवलेल्या चाकूने वार केला, तिचा गळाच कापला आणि तिने घटनास्थळावरून पळ काढला.
रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेल्या झालेल्या सविताला पाहून घरातील लोक घाबरले, एकच गोंधळ माजला. त्यानंतर आजूबाजूचे लोकांच्या मदतीने जखमी सविताला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची अवस्था गंभीर असल्याने तिला दिल्लीतील एम्समध्ये पाठवण्यात आले. तिच्यावर सध्या एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबद्दल एसीपी कविनगर अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, आरोपी महिला घटनास्थळावरून पळून गेली. जखमी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी महिलेला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच आरोपी महिलेला अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.