लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. कुणाचं दिमाग कसं चालेल याचा नेम नाही. पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यात पोलिसांनी मेमारी पोलीस ठाणे परिसरात एका घरावर छापेमारी केली आहे. यावेळी पोलिसांनी 41 लाख रुपयांची कॅश आणि 47 किलोचा गांजा पकडला आहे. पोलिसांना एक गुप्त खबर मिळाली होती. त्या आधारे पोलिसंनी ही कारवाई केली. धक्कादायक म्हणजे बकरी फार्म हाऊसच्या नावाखाली हा धंदा सुरू होता. हा संपूर्ण प्रकार पाहून पोलीसही हादरून गेले.
पूर्व बर्धमान जिल्ह्यात बकरी फार्म हाऊसच्या खाली एक तहखाना होता. या ठिकाणी गुप्तपणे गांजा तस्करी सुरू होती. संपूर्ण माल या ठिकाणी ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या टीमने या तहखान्यात तीन तास सर्च ऑपरेशन केलं. पोलिसांना या कारवाईत गांजाच्या छोट्या पुड्या आणि मोठ्या पुड्यांसह एक किलोचं पॉकेटही मिळालं आहे. गांज्याची छोटी पुडी 50 रुपये आणि मोठी पुडी 100 रुपयांना विकली जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेची आई गेल्या 20-25 वर्षापासून गांजा तस्करी करतेय. अटक करण्यात आलेल्या महिलेने काही वर्षापूर्वीच या धंद्यात पाऊल टाकलं. या ठिकाणी गांज्यासोबतच मोठ्या प्रमाणावर नोटा सापडल्या. नोटा प्रचंड प्रमाणात असल्याने त्या मोजण्यासाठी एक काऊंटिंग मशीन आणण्यात आली. ही रक्कम मोजली असता 41 लाख 87 हजार 280 रुपये असल्याचं आढळून आलं, असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑर्क बनर्जी यांनी सांगितलं. बकरी फार्म हाऊसच्या तहखान्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाच्या गड्ड्या पाहून पोलीसही आवाक झाले होते.
आरोपी महिलेला कोर्टात हजर करण्यता आलं होतं. तिला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईनंतर गांजा तस्करीचं एक मोठं नेटवर्क उघड होऊ शकतं. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा कुठून आणला? त्यांना पैसे कोणी दिले? याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरही छापे मारण्यात येणार आहेत.