मुंबईत सध्या गुन्ह्यांच्या, चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यामुळे सामान्य नागरिक अगदी हैराण झालेत. सध्या गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. यादरम्यान अनेक भाविक गणरायासाठी अनेक भेटवस्तू घेतात, दागिने घडवतात. मात्र गणपती बाप्पासाठी घडवलेले दागिनेच चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणजळ घडली होती. दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने दोघा चोरट्यांनी हे कृत्य करत लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला. अखेर मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखा कल्याण युनिट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटजेच्या मदतीने चोरांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. अल्तमस रज्जाक खान आणि शुभम संदीप ठसाळे अशी या दोन्ही सराईत आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
धावत्या लोकलमध्येच दागिने गायब
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारे सखाराम साळुंके यांनी गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीला घालण्यासाठी घेतलेल्या सोन्या-चांदीची बॅग लोकलमध्ये गायब झाली होती. सीएसएमटीवरून कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करत असताना, साळुंके यांनी सातत्याने बॅगकडे लक्ष ठेवले होते. मात्र, ठाकुर्ली स्थानकाजवळ गाडी थांबल्यानंतर बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित डोंबिवली रेल्वे स्थानक गाठून तक्रार नोंदवली.साळुंके यांनी घेतलेली ही बॅग झवेरी बाजारातून सोन्या-चांदीने भरलेली होती, ते दागिने गणेशाच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणार होते. मात्र ते दागिनेच गायब झाल्याने साळुंके प्रचंड हादरले होते, त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. सीएसएमटी ते ठाकुर्लीदरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद व्यक्ती आढळल्या. तपासानंतर पोलिसांनी अल्तमस रज्जाक खान आणि शुभम संदीप ठसाळे यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. सर्व आरोपींनी चोरी केल्याचे सांगत गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 7 लाख 34 हजार रुपयांचे सोनं-चांदी जप्त केले आहे. दोघेही अल्पवयीन आरोपी महाविद्यालयात शिकणारे असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, तर अल्तमस आणि शुभम यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.