पुणे / अभिजीत पोते : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानातून 69 ग्रॅम वजनाचे दागिन्यांची चोरी केल्याची खळबळजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने 5 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दागिने घेऊन आरोपी फरार झाला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
पुण्यातील भवानी पेठेत एका ज्वेलर्सच्या दुकानात दुपारी पावणे चारच्या सुमारास एक चोरटा ग्राहक बनून दुकानात आला. चोरट्याने दुकानात आधी एक ग्रॅम सोने खरेदी केले. नंतर त्या इसमाने दुकानदाराला आणखीन काही दागिने दाखवायला सांगितले. दुकानदाराने असे जवळपास 69 ग्रॅमचे दागिने त्याला दाखवले.
दागिने बघत बघता तो पाच मिनिटाने बाहेर गेला. त्यानंतर बाहेरून त्याने छोटी छोटी दगड आपल्या खिशात टाकून आत आणले. दुकानदाराचे लक्ष नसताना ते छोटे दगड दागिन्यांच्या पाकिटात ठेवले आणि दागिने बघत बघत हळूच त्याने ते दागिने खिशात ठेवले. नंतर तो फोनवर बोलण्याच्या कारणाने बाहेर आला आणि तिथून फरार झाला.
चोरीची बाब लक्षात येताच दुकानदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दुकानदाराच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे.