गोंदिया – काल गोंदिया (GONDIA) शहर एका वेगळ्या दुर्घटनेमुळे हादरुन गेलं. पती-पत्नीच्या वादात आईचा जीव गेल्याची घटना गोदिंया जिल्ह्यातील शिवनगर परिसरात (SHIVNAGAR)घडली. विशेष म्हणजे ही घटना पाहिल्यानंतर गावकरी सुध्दा हादरुन गेले आहेत. पोलिसांनी (GONDIA POLICE) आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.
पती-पत्नीच्या झालेल्या वादात पत्नी माहेरी गेली, त्यामुळे तणावात असणाऱ्या मुलाने आईला लाकडाने डोक्यावर मारून ठार केल्याची घटना गोंदिया शहरातील शिवनगर परिसरात घडली. लक्ष्मी भजनलाल पल्लारे (54, रा. शिवनगर, भगतसिंग वॉर्ड, विजयनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर दुर्गेश भजनलाल पल्लारे (28) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने आपल्या पत्नीशी वाद केल्याने पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. पत्नी निघाल्यानंतर आरोपीने घरातून बाहेर जाताना आई मृत लक्ष्मी पल्लारे यांना घरातच राहण्यास सांगितले. आरोपी आपल्या घरी परत आला त्यावेळी आईसुध्दा घराबाहेर गेल्याचे त्याला समजले.
थोड्या वेळातच आरोपीची आई लक्ष्मी पल्लारे घरी परत आली, आरोपीने त्यावरून आईशी भांडण करून घरातील खाटेच्या लाकडी ठाव्याने तोंडावर, डोक्यावर व पाठीवर मारून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मी पल्लारे यांना रुग्णवाहिकेने रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
आरोपीची मामी पूर्णा डिलुचंद खरे (55, रा. विमलताई शाळेजवळ, विजयनगर) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करत तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.