शाहिद पठाण टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 2 नोव्हेंबर 2023 : शहरातील चोरी, घरफोडीच्या घटना वाढल्या असून आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. गपूर येथील मुलीच्या घरी कार्यक्रमासाठी गेलेल्या गोंदियातील शेख कुटुंबीयांना चोरांमुळे मोठा फटका बसला. चोरींनी त्यांच घर फोडून सुमारे २ लाखांचे दागिने पळवले. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीच वातावरण आहे. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
लाखोंचे दागिने गायब
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंचशिल चौक, माताटोली येथे राहणाऱ्या बेगम खुर्शीदो नासीर शेख (62) या पतीसोबत 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता मुलीच्या घरी नागपूर येथे काही कार्यासाठी गेल्या होत्या. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास त्या घरी परत आल्या आणि समोरचं दृश्य पाहून हादरल्याच. घराच्या दरवाजाची कडी तोडलेली होती. चोरट्यांनी घरात घुसून 35 हजार रुपयांची रोख रक्कम आणि त्यासह 2 लाख 10 हजार 890 रुपयांचे दागिने पळवून नेले. अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील हे दागिने चोरून नेले.
यानंतर बेगम खुर्शीदो नासिर शेख (62) यांनी गोंदिया शहर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत चोरीची तक्रार नोंदवली. त्या आधारे पोलिसांनी भादंविच्या कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास करत पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
जादुटोण्याच्या संशयातून धिंड, 12 जणांना 3 वर्षांची सक्तमजुरी
गोंदिया तालुक्यातील जब्बारटोला येथील पन्नालाल बघेले (65) यांना मांत्रिक असल्याच्या संशयातून गावातील लोकांनी 29 जून 2016 रोजी सामूहिक मारहाण करून गावातून धिंड काढली होती. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने जब्बारटोला येथील 12 जणांना 3 वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे.
गोंदिया तालुक्यातील जब्बारटोला येथील पन्नालाल बघेले यांना हिवराफाटा येथे 29 जून 2016 रोजी रात्री 8 वाजताचे दरम्यान गावकऱ्यांनी मारहाण करून त्यांची धिंड काढली होती. या प्रकरणात 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. जब्बारटोला येथील काही लोकांनी आपल्याला होत असलेल्या त्रासासाठी पन्नालाल बघेले याने केलेला जादुटोणा कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांना रात्री रस्त्यात अडवले. त्यांना जाब विचारला आणि बेदम मारहाण केली. यात पन्नालाल बघेले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
या घटनेसंदर्भात पन्नालाल यांचा मुलगा संतोष बघेले यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक यांनी केला होता. अखेर या प्रकरणातील 12 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.