नाशिक : दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून थर्टी फर्स्ट पूर्वी ठिकठिकाणे पथके तपासणीसाठी लावलेले असतात. अवैध मद्य वाहतुक होत असल्याच्या कारवाई या काळात अधिक होत असतात. यंदाच्या वर्षीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती भागात तपासणी पथक कार्यरत ठेवले आहे. याच दरम्यान नाशिक-वणी रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाने केलेली एक कारवाई चर्चेत आली आहे. कसबे वणी येथे करण्यात आलेल्या कारवाईची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा स्वॅग आणि कामही पुष्पा चित्रपटातील पुष्पा भाऊ सारखं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालघर येथील दिनानाथ सीताराम पाल हा अवैध मद्य वाहतुक करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या जेलची वाहतुक करत असल्याचे दाखवत ब्रॅण्डेड मद्याची वाहतूक केली जात होती.
ड्रममध्ये वरील बाजूला साबण निर्मितीसाठी लागणारे जेल असायचे आणि त्या खाली प्लॅस्टिकची पॅकिंग लावून ब्रॅंडेड मद्याचा साठा असायचा, त्यामुळे वर्षानुवर्षे यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करत अवैध मद्य वाहतुक सुरू होती.
कळवण विभागातून ही वाहतुक होत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी तपासणी केली, त्यात ब्रॅंडेड दारूची वाहतुक करण्यासाठी शक्कल लढवल्याचे दिसून आले.
कारवाईच्या दरम्यान मात्र वाहतुक करणारा दीनानाथ पाल चा स्वॅग हा पुष्पा चित्रपटातील पुष्पा भाऊ सारखाच होता, त्याने अगदी राज्य उत्पादन विभागाच्या पथकाला कारवाई दरम्यान तशी प्रचितीही आणून दिली होती.
एस. एल. ई. एस जेलची कागदपत्रे दाखवून अवैध वाहतुक करत नसल्याचे अगदी ठासून सांगितले होते, त्यात त्याचा रुबाबही पुष्पा भाऊ सारखाच असल्याचे पथकातील कर्मचारी सांगत आहे.
या कारवाईत वाहन व मद्यसाठा असा ११ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कळवण विभागाचे निरीक्षक सुनील सहस्त्रबुध्दे, दीपक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.