नाशिक : नाशिकमध्ये पोलीस नेमकं काय करताय असा संतप्त सवाल नाशिकच्या (Nashik) अंबड परिसरातील नागरिक उपस्थित करत आहे. गेल्या आठवड्यात नागरिकांच्या (Citizen) घरावर दगडफेक करत हातात धारधार शस्र घेऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचे आरोपी अद्यापही पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत. शहरात ही घटना ताजी असतांना पुन्हा त्याच अंबड परिसरात दुचाकी जाळून गुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नाशिक शहरात गुंडांचा हैदोस (Nashikcrime) घालण्याचा प्रकार सातत्याने सुरू असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अंबड पोलिसांत याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असून पोलीसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नाशिकच्या अंबड परिसरात दत्तनगर भागात 15 ते 20 गुंडांनी नागरिकांच्या घरावर दगडफेक करत धारधार शस्र घेऊन हैदोस घातला होता.
या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच दत्तनगर परिसरातील संदीप नाठे यांच्या घराबाहेर असलेलली दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे.
संदीप नाठे यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच १५ जीवाय ९८३८) पेट्रोल टाकून जाळली. दुचाकी जळत असताना अचानक टायर फुटल्याचा आवाज आल्याने नाठे हे बाहेर आले.
घराच्या बाहेर मोठा आवाज झाल्याने नागरिक बाहेर जमा झाले होते. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुचाकी जाळून खाक झाली होती.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अंबड पोलिसांना दिल्यानंतर अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे आता गुंडाचा शोध पोलीस कधी घेणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.