कोल्हापूर : पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्ये टोकळ्याने दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरच्या पाचगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणांच्या टोळक्याने तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. फॅमिली विभागात जेवण्यावरून झालेल्या वादातून हॉटेल मालक आणि तरुणांमध्ये ही तोडफोड झाली. याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेला पाचगावमधील कुख्यात गुंड दिलीप जाधव याचा मुलगा सुजित जाधव याच्यासह दहा ते पंधरा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचगाव परिसरात दिलीप जाधव आणि अशोक पाटील यांच्यामध्ये टोळी युद्धातून तीन खून झाले आहेत. या घटनांनंतर शांत असलेल्या पाचगाववर पुन्हा एकदा दहशतीचे सावट आले आहे.
पाचगाव येथील गिरगाव घाटातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुजित जाधव त्याच्या तीन मित्रासंह जेवायला आला होता. यावेळी हॉटेलमधील फॅमिली विभागात जेवणावरुन त्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरवात केली.
वाद इतका वाढला की आरोपीने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हॉटेलच्या बाहेरचा फलक पण तोडला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्याने 10 ते 12 साथीदारांना फोन करुन बोलावून घेतले. यानंतर या टोळक्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत तोडफोड केली.
या मारहाणीत हॉटेल चालकासह त्याचा मुलगा जखमी झाला आहे. यानंतर हॉटेल मालक विक्रम क्षत्रिय यांनी करवीर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. करवीर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.