नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका रेल्वे अधिकाऱ्याकडे तब्बल 2.61 कोटीचे घबाड सापडले आहे. सीबीआयने रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ मटेरियल मॅनेजर के.सी. जोशी यांना तीन लाखाची लाच स्वीकारताना मंगळवारी रंगेहात अटक केली आहे. संपूर्ण दिवसभर त्यांच्या मालमत्तांवर छापेमोरी टाकण्यात आली असून एकूण 2.61 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रेल्वेच्या एका कंत्राटदाराने लाच प्रकरणात केलेल्या तक्रारीनंतर जोशी यांना सापळा रचून सीबीआयने अटक केली आहे.
गोरखपूर येथील रेल्वेचे मुख्य प्रबंधक साल 1988 च्या बॅचचे इंडीयन रेल्वे स्टोअर सर्व्हीस ( irss ) अधिकारी के.सी.जोशी यांना गोरखपूर येथील मेसर्स सुक्ती एसोसिएटचे मालक प्रणव त्रिपाठी यांच्या तक्रारी नंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. आरोपीविरोधात लाच मागितल्याची तक्रार येताच सीबीआयने मंगळवारी सापळा रचला. आणि आरोपी जोशी याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्यानंतर आरोपीच्या गोरखपूर आणि नोएडा सेक्टर – 50 येथील सरकारी घराची झडती घेतली असता सीबीआयला 2.61 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली.
आरोपीने गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस ( GEM ) पोर्टलमधून तक्रारदार त्रिपाटीच्या फर्मचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची धमकी देऊन सात लाखाच्या लाचेची मागणी केली आहे. तक्रारदार प्रणव त्रिपाठी यांना नॉर्थ इस्ट रेल्वेत तीन ट्रकच्या पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते. हे कंत्राट मिळाल्यानंतर ते सुरु ठेवण्यासाठी लाचेची मागणी रेल्वे अधिकारी जोशी यांनी त्यांच्याकडे केली होती. अन्यथा रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल अशी धमकी त्यांना देण्यात आली होती.