मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. आदेश आनंद जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध मुंबईतील गोरेगाव, कुरार, खार, पवईसह इतर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. कर्ज मिळवून देण्यासाठी कागदपत्रं घ्यायचा. कर्ज मिळवायचा पण कर्जाची रक्कम घेऊन फरार व्हायचा. आरोपीने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
फिर्यादी महिला मनिषा हांडे या महिलेला गावचे घर दुरुस्ती करण्यासाठी पैशांची गरज होती. यासाठी मनिषा आणि त्यांचे पती विविध बँकेत चकरा मारत होते. मात्र त्यांना कर्ज मिळत नव्हते. याचदरम्यान त्यांची ओळख आदेश जाधव याच्याशी झाली.
आदेशने सदर महिलेला वैयक्तिक कर्ज मिळवून देतो असे सांगितले. यासाठी त्याने महिलेकडून कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे घेतली. यानंतर काही दिवसांनी महिलेच्या घरी फेडरल बँकेचे वन नावाचे कार्ड आले.
याबाबत त्यांनी आरोपीला विचारले असता हे कार्ड कर्ज मिळवण्यासाठी उपयोगाचे असल्याचे सांगितले. मग दोन दिवसांनी आरोपीने महिलेच्या घरी येऊन कार्डचे फोटो काढून घेऊन गेला. काही दिवसांनी फेडरल बँकेकडून महिलेला कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी फोन येऊ लागले.
पीडित महिला वारंवार याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपीला फोन करत होती, मात्र त्याचा फोन बंद येत होता. अखेर महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी फसवणुकीची तक्रार दाखल करत तपास सुरु केला.
पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर याआधीही मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.