म्हैसूर : म्हैसूरजवळील सागरकत्ते एका 75 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. कर्नाटक पोलिसांनी त्या महिलेच्या हत्येचा उलगडा केला आहे. त्या महिलेच्या हत्येमागे तिच्याच नातवाचा हात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हत्येनंतर आरोपीने दिवसभर मृतदेह आपल्या कारमध्ये ठेवला होता आणि कार घेऊन फिरत होता, असे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
सुप्रीत असे अटक करण्यात आलेल्या नातवाचे नाव असून तो 23 वर्षांचा आहे. सुप्रीत हा म्हैसूर येथील गायत्रीपुरम लेआउटचा रहिवासी आहे. तर सुलोचना असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.
30 मे रोजी म्हैसूर तालुक्यातील सागरकट्टे गावाजवळ पोलिसांना एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेह गंभीररित्या जळाला असल्याने ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून केसांचे नमुने आणि चष्मा गोळा करून तपास सुरू केला. पोलिसांनी म्हैसूर शहरातील नजरबाद पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता प्रकरणाचा तपास केला असता, त्यांनी संशयाच्या आधारावर तक्रारदाराच्या नातवाची चौकशी सुरू केली. बरीच चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याची आजी त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. 28 मे रोजी दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात आरोपीने आजीला मारहाण करून तिचा चेहरा उशीने दाबून खून केला.
कोरियन वेब सिरीज पाहिली
नंतर मृतदेह प्लास्टिकच्या आच्छादनात गुंडाळून एका कार्टन बॉक्समध्ये ठेवला. मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची हे शिकण्यासाठी सुप्रीतने कोरियन वेब सिरीज पाहिली. आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवला आणि केआरएस धरणाजवळ नेऊन पेटवून दिला.
आरोपीने पोलिसांना सांगितले होते की, त्याने दिवसभर गाडी चालवली. कारमध्ये आजीचा मृतदेह दिवसभर पडून होता. मृतदेह कारमध्ये ठेऊन तीच कार घेऊन तो आज्जी हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला होता.