सोलापूर / सागर सूरवसे : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दोन मजली किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शॉपिंग कॉम्पलेक्स असल्याने शेजारील दुकानाचेही नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत दुकानाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
टाकळी सिकंदर येथे चंद्रकांत दिलीप वाघमोडे यांच्या मालकीचे वाघमोडे किराणा नामक दोन मजली दुकान आहे. या दुकानाला सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले आणि दुमजली दुकान जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी भीमा साखर कारखाना, लोकनेते साखर कारखाना, पंढरपूर नगरपरिषद अशा तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
शॉपिंग कॉमप्लेक्स असल्याने शेजारील दुकानाचे आगीत नुकसान झाले आहे. शेजारी खताचे दुकान आहे. या दुकानाचे आगीत नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राशमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी अग्नीशमन दलाकडून आगीचे नक्की कारण शोधण्याचे काम सुरु आहे.
साताऱ्यात खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. लोणंद शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. व्हॅनमधे शेडगेवाडी येथील आठ ते दहा विद्यार्थी होते. व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र या आगीत स्कूल व्हॅन संपूर्ण जळून खाक झाली आहे.