सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : डोंबिवलीत एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. एकीशी साखरपुडा करुन दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढली आहे. नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ शिंदे असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. दिलीप शिंदे आणि शांता शिंदे अशी नवरदेवाच्या आई-वडिलांची नावे आहेत. सिद्धार्थ याने पीडित मुलीशी चार वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर चार वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवत होता. मात्र तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरुन तरुणासह त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले.
सिद्धार्थ आणि त्याच्या पालकांची एका नातेवाईकाच्या साखरपुड्यात पीडित तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली, मग सिद्धार्थच्या पालकांनी तरुणीच्या घरी जाऊन रितसर मागणी घातली. यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने दोघांचा 2017 साखरपुडा पार पडला. साखरपुडा झाल्यानंतर दोघेही एकत्र फिरत होते, एकमेकांना वेळ देत होते. यादरम्यान सिद्धार्थने तरुणीसोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले.
तरुणीने विरोध केल्यास तिला आपला साखरपुडा झाला असून, लवकरच लग्न करणार आहोत असे सांगितले. तरुणीच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला फसत गेली. सिद्धार्थने या काळात तरुणीकडून पैसे घेतले. यानंतर तरुणी वारंवार त्याच्याकडे लग्नाची मागणी करु लागली. मात्र सुरुवातीला काही ना काही कारण सांगत टाळाटाळ करत होता. मात्र नंतर त्याने तिला धमकावायला सुरुवात केली.
काही दिवसांनी तरुणीला सिद्धार्थचे लग्न जुळल्याचे कळले. तिने हळजीच्या दिवशी त्याच्या घरी जाऊन खात्री केली. यानंतर तरुणीने विष्णुनगर पोलीस ठाणे गाठत सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल केली. ऐन लग्नाच्या दिवशीच पोलीस लग्नमंडपात हजर झाले अन् सिद्धार्थला थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सिद्धार्थसह त्याच्या आई-वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.