इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर (indore) शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे मंगळवारी एका विवाह सोहळ्याचे आनंदी वातावरण क्षणभरात दु:खात बदलले, कारण अवघ्या 21 वर्षांच्या नवऱ्या मुलाचा (groom died) अचानक मृत्यू झाला.
एका मंदिरात तरूण-तरूणीचा विवाह सोहळा पार पडत होता. या मंगल प्रसंगी आशिर्वाद देण्यासाठी वर-वधूकडील दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. सगळं उत्तम सुरू होतं, पण अचानक कुठेतरी माशी शिंकली आणि काही कारणावरू वाद सुरू झाला. त्यानंतर नवऱ्या मुलाने विषप्राशन केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. वराने विष घेतल्याचे कळताच 20 वर्षीय वधूनेही पुढचा मागचा कोणताही विचार न करता तिनेही विष प्यायले.
दोघांनाही उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तो वर मृत झाल्याचे घोषित केले. तर वधूची तब्येत अजूनही गंभीर असल्याचे समजते. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
इंदौर शहरातील लग्नसमारंभादरम्यान भांडण झाल्यावर वराने विष घेतले. त्यानंतर वधूनेही विष प्यायले. यामध्ये त्या तरूणाचा मृत्यू झाला तर तरूणीवर अद्याप उपचार सुरू आहेत. ती अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
वराच्या कुटुंबियांनी केले आरोप
याप्रकरणी नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांनी वधूवर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती तरूणी त्या तरूणावर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र त्याला इतक्यात लग्न करायचे नव्हते. त्याला करीअरकडे लक्ष द्यायचे होते. यासाठी त्याने तरूणीकडे दोन वर्षांचा कालावधीही मागितला होता. मात्र त्यानंतर त्या तरूणीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तरूण मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच वधूचा घरच्यांची मनस्थितीही ठीक नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.