बाराबंकी : लग्नमंडप म्हटलं की रुसवे फुगवे, चिडणे-चिडवणे आलेच. उत्तर प्रदेशातील एक लग्न मात्र सध्या विशेष चर्चेत आले आहे. मोटारसायकल मिळाली नाही म्हणून नवरदेवाने लग्न मंडपातून पळ काढल्यामुळे हे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मोटारसायकलची मागणी पूर्ण न झाल्याने लग्न न करताच नवरा वरात घेऊन परत गेला.
नवरोबाने वधूकडून हुंड्याच्या रूपात मोटरसायकल मागितली होती. त्याची ही अपेक्षा वधू पक्षाकडून पूर्ण करण्यात आली नाही. ऐन लग्नात आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच नवरोबाने वधूला लग्न मंडपातच ठेवत पळ काढण्याचा निर्धार केला.
नवरोबा अचानक मंडपातून गायब कसा झाला, याची एकच चर्चा नंतर रंगू लागली. या मागील कारण उघड झाल्यानंतर मात्र सगळे चक्रावून गेले. या घटनेची सध्या उत्तर प्रदेशसह संपूर्ण सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली आहे.
लग्नमंडपात सर्वत्र उत्साह होता. वधू आणि वर अशा दोन्ही पक्षाकडचे लोक गाण्यावर ताल धरून बेभान होत नाचत होते. याचदरम्यान नवरोबाच्या वऱ्हाडींनी वधूकडील नातेवाईकांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादाने अचानक उग्र रूप धारण केले. यावेळी नवरोबाने मुलीच्या आई वडिलांकडे हुंडा म्हणून मोटारसायकल मागितली. त्याची ही मागणी पूर्ण करण्यास वधूचे नातेवाईक तयार झाले नाहीत. त्यामुळे नवरोबा खवळला. त्याने भर लग्न मंडपातच वधूला धडा शिकवण्याचे ठरवले आणि मंडपातून पळ काढला.