गांधीनगर : गुजरातमधील जामनगरमध्ये ऑनर किलिंगच्या (Honor Killing) नावाखाली दुहेरी हत्याकांडाच्या (Double Murder) घटनेने खळबळ उडाली आहे. आंतरजातीय विवाहाचा (Inter Caste Marriage) राग आल्यामुळे वधूपक्षाने तरुणाची हत्या केली. यानंतर काही वेळातच मुलाच्या घरच्यांनी सुनेच्या आईची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
जामनगरमधील हापा योगेश्वर धाम परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय सोमराजचा त्याच ठिकाणी राहणाऱ्या रुपलखासोबत प्रेम विवाह झाला होता. मुलगा चारण समाजाचा होता, तर मुलगी क्षत्रिय समाजाची. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे आनंदी नव्हती. मुलीच्या कुटुंबीयांना एवढा राग आला की त्यांनी त्या तरुणाचा खून करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्याची शोधाशोध सुरु केली.
दरम्यान, राजकोट रोडवरील अतुल शोरूमजवळ सोमराज उभा असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. लगेच ते तिथे पोहोचले. पत्नीच्या घरच्यांना पाहताच सोमराज जवळच्या शोरूममध्ये घुसला. मात्र सूड घेण्याच्या उद्देशाने आलेल्या सशस्त्र वधूपक्षाने शोरूममध्ये घुसून तरुणाची हत्या केली.
त्यामुळे संतप्त झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनीही मुलीच्या घरी जाऊन जाब विचारला. त्यावेळी मुलीची आई अनिता बाला घरात होती, त्यामुळे बदला घेण्यासाठी त्यांनी वधूमायेची हत्या केली.
जामनगरचे एसपी प्रेमसुख डेलु यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनांचा मुख्य आधार प्रेम प्रकरण आहे. या लग्नामुळे त्यांच्या कुटुंबीयांची नाराजी होती. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.