मुंबई : हजारो एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आता पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांचा मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा असा प्रवास पाहायला मिळाला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानवर झालेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. तिथून त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला. त्यानंतर आता सातारा कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना कोल्हापूर पोलिसांच्या (Kolhapur Police) ताब्यात देण्यात आलाय. साधारण महिनाभरापूर्वी आझाद मैदानावरुन सदावर्ते सरकारविरोधात जोरदार घोषणा देत होते. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परबांवर तुटून पडत होते. तेच सदावर्ते आता पोलिसांसोबत जिल्ह्या जिल्ह्याची वारी करताना दिसत आहे. सदावर्ते यांच्यावर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, सोलापूर अशा अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबईत 8 एप्रिल रोजी शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शंभर पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार राडा घातला होता. पवारांच्या घरावर चप्पल, दगड फेकण्यात आले. हा हल्ला सदावर्ते यांनीच घडवून आणल्याचा आरोप झाला. त्यानंतर सदावर्ते यांना अटकही झाली. चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पुढे त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आलं. मात्र, त्याच वेळी एका प्रकरणात त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला.
गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. साताऱ्यातील राजेंद्र निकम यांनी सदावर्तेंच्या वक्तव्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन ऑक्टोबर 2020 मध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलं होतं. तिथेही सदावर्तेंना चार दिवस पोलीस कोठडीत काढावे लागले. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्याचवेळी कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंना ताब्यात घेतलंय.
सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती केल्यानंतर त्यांच्याविरोधात कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल आहे. मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठई सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवल्या प्रकरणी आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.
सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या निकालाबाबत त्यांनी न्यायालयाच्या निकाला अवमान केल्याबाबत आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
अकोल्यातील अकोट पोलिस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. एसटी आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आकोटमधील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांनी 74 हजार 400 रुपये सदावर्ते यांच्याकडे जमा केले होते. हे पैसे अजय गुजर यांच्यामार्फत सदावर्तेंपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे पुरावे मालोकार यांनी पोलिसांना दिले आहेत.
सदावर्ते यांच्याविरोधात बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजात जाणिवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भाजपच्या स्वप्नील गलधर यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार सदावर्ते यांच्या विरोधात कलम 153 (अ), 295 (अ), 505 (2) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि बांधकाम व्यावसायिक अमर रामचंद्र पवार यांनी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार केली होती. सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानुसार 9 सप्टेंबर 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
इतर बातम्या :