नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : बहीण-भावाचं नातंच वेगळं ! एकमेकांशी कितीही भांडले, टोमणे मारले, एकमेकांवर कितीही रागावले तरी संकटाच्या वेळेस भक्कमपण पाठिशी उभे राहतात. आनंदाच्या क्षणी तर एकमेकांसोबत तो आनंद वाटून दुपप्ट होतो. कठीण परिस्थितीतही साथ सोडत नाहीत. पण बहिणीला किंवा भावाला काही झालं तर जीव वरखाली होतो. असाच एक फोन गुरूग्राममध्ये राहणाऱ्या मुकेशला आला आणि त्याचं आयुष्यचं (crime news) बदललं.
बुधवारी मध्यरात्री साखरझोपेत असताना मुकेशला त्याच्या बहिणीच्या नवऱ्याचा, जीजाजींचा फोन आला. ते पाहून तो घाबरला. तुझ्या बहिणीची तब्येत बरी नाही, लगेच घरी (गुरूग्राम) ये. हे ऐकताच त्याने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि भर रात्री तो बहिणीकडे निघाला. मात्र तेथे गेल्यावर समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मुकेशची बहीण सीमा जमिनीवर पडली होती आणि तिच्या अंगावर चादर घातली होती. त्याने पुढे जाऊन तिला हात लावला असता ते थंड पडलेलं आढळलं. क्षणभरातच त्याला समजलं की त्याच्या प्रिय बहीणीचा मृत्यू झाला आहे.
मुकेशची बहीण सीमा आणि अनिल यांचा प्रेमविवाह झाला होता. वर्षभराच्या छोट्या लेकीसह ते वाटिका कुंज येथे राहत होते. मात्र तिच्या अकस्मात मृत्यूने सर्वच हादरले. पण तिचा पती अनिल याने सीमाची हत्या केली आहे, असा आरोप तिच्या भावाने लावला. गळा दाबून तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय त्याने व्यक्त केला. आपण जेव्हा बहिणीच्या घरी पोचलो तेव्हा ती जमिनीवर झोपली होती. तिच शरीर थंड पडलं होतं. आणि तिच्या मानेवर जखमेचे आणि काही लागल्याचे वळ होते. तिला मृतावस्थेत पाहून , तिचा भाऊ मुकेश कोलमडला.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तपासाची कारवाई सुरू करत त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला व नंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या मृत्यूसंदर्भात संपूर्ण माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान मृत महिलेचा पती अनिलविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.