गुडगांव | 6 ऑक्टोबर 2023 : देशातील गुन्ह्यांची तीव्रता वाढत आहे. महिला, तरूणी, लहान मुली यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण तर प्रचंडच वाढले आहे. अशीच एक अत्याचाराची नृशंस घटना राजधानी दिल्लीच्या शेजारील गुडगावमध्ये घडल्याने सर्व हादरले. १० महिने उलटून गेल्यानंतरही त्या अत्याचाराची तीव्रता, त्यामुळे झालेल्या जखमा कमी झाल्या नाहीत. अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला वासनेची शिकार बनवणारा तो आरोपी मात्र खुलेआम फिरत असल्याने जखम भळभळतच होती. अखेर १० महिन्यांनी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीचा (accused arrested) शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्याने पीडित कुटुंबाला थोडा तरी दिलासा मिळाला.
गुडगांव जवळील बादशाहपुर येथे तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचारानंतर फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात दहा महिन्यांनी यश मिळाली. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. गोविंद असे त्याचे नाव असून तो हा मूळचा नरसिंहपूरचा रहिवासी असून घटनेच्या वेळी तो गुरुग्राम येथे राहून मजुरीचे काम करत होता. अत्याचाराच्या घटनेनंतर बादशाहपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. मात्र बराच काळ त्याचा शोध न लागल्याने त्याची माहिती देणाऱ्यास ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असेही पोलिसांनी जाहीर केले होते.
अटकेच्या भीतीने फोन फेकला आणि पायीच सुरू केला प्रवास
अखेर तब्बल १० महिन्यांनी त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुग्राम न्यायालयात हजर केले आणि कोठडी सुनावली. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंद हा सराईत गुन्हेगार आहे, मात्र (अत्याचाराच्या) या घटनेनंतर त्याला पहिल्यांदाच अटकेची भीती वाटत होती. त्यामुळ गुन्ह्यानंतर त्याने सर्वप्रथम त्याचा मोबाईल फोन फेकून दिला. पकडले जाऊ नये म्हणून तो गुरुग्रामहून येथून पायी चालतच नरसिंगपूरच्या दिशेने निघाला. या संपूर्ण काळात त्याने बस किंवा ट्रेनने प्रवास केलाच नाही. एकदा गावाला पोहेचल्यावर त्याने पुन्हा मजदूरी करण्यास सुरूवात केली.
गुन्ह्याच्या या घटनेला १० महिने उलटून गेल्याने आता सगळं थंड झालंय असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो खुलेआम फिरू लागला. पण गुरुग्राम पोलिसांनी त्याची आधीच ओळख पटवली होती आणि त्यांच्या नेटवर्कद्वारे त्याच्या घरावरही नजर ठेवली होती. अशा स्थितीत इनपुट मिळताच पोलिसांनी नरसिंहपूर गाठून त्याला पकडले. त्या चिमुरड्या बालिकोवर अत्याचाराची ही घटना 12 जानेवारी 2023 रोजी घडली. त्यावेळी पीडित मुलीचे कुटुंबिय घरी नव्हते. मात्र घरी परतल्यावर मुलीची अवस्था पाहू ते हादरले. त्यांनी तत्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्यानंतर प्राथमिक तपासातच आरोपीची ओळख पटली, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ अनेक ठिकाणी छापा टाकण्यात आला होता पण तिथे तो सापडला नाही. अखेर माहितीवरून त्याच्या गावी छापा टाकला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. या आरोपीविरुद्ध फरीदाबादमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मध्य प्रदेशात मारामारीचे दोन आणि गुरुग्राममध्ये अत्याचाराचे एक प्रकरण आहे.