नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन (China)ने सतत कुरापती सुरू ठेवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनच्या 5जी नेटवर्क (5G Network)ची घुसखोरी लष्कराच्या संभाषण उपकरणांमध्ये अडथळा आणत असल्याचे उघड झाले आहे. त्यापाठोपाठ आता चीनच्या हॅकर्स (Hackers)ची भारताविरोधात सुरू असलेली कट-कारस्थाने प्रकाशझोतात आली आहे. चीनच्या हॅकर्सनी अलिकडच्या काही दिवसांत लडाखच्या सीमेलगत असलेल्या काही वीज वितरण केंद्रांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांचा तो कट यशस्वी झाला नाही. वीज वितरण केंद्रांना लक्ष्य करून भारताला अंधारात लोटण्याचा चीनचा डाव होता. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी चीनच्या या नव्या कुरापतीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चीनी हॅकर्सनी आमच्या वीज वितरण केंद्रांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने नवनव्या कुरापती सुरू ठेवल्या आहेत. आठवडाभरापूर्वी चीनच्या युद्धसरावातील एका लढाऊ विमानाने भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय सुरक्षा दलांच्या रडारमध्ये त्या लढाऊ विमानाच्या घुसखोरीचा प्रयत्न निदर्शनास आला. चीनने हवाई हद्दीच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याबद्दल नंतर भारताने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. त्याचदरम्यान चीनच्या 5जी नेटवर्कची घुसखोरीही उघड झाली आहे. त्यानंतर आता चीनी हॅकर्सचा प्रताप समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा ‘हाय अॅलर्ट’ मोडवर सज्ज झाल्या आहेत. चिनी हॅकर्सनी लडाखजवळील वीज वितरण केंद्रांना टार्गेट करण्याचे दोन प्रयत्न केले. पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आमची संरक्षण यंत्रणा सक्षम आहे, असा दावा केंद्रीय केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी एएनआय वृत्तसंस्थेने सांगितले.
खाजगी गुप्तचर फर्म रेकॉर्डेड फ्यूचरने म्हटले आहे की, चिनी हॅकर्सनी लडाखजवळील भागात ग्रिड नियंत्रण आणि वीज वितरणासाठी जबाबदार असलेल्या किमान सात ‘लोड डिस्पॅच’ केंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. अलिकडच्या काही महिन्यांत आम्ही या संबंधित राज्यांमध्ये ग्रिड नियंत्रण आणि वीज प्रेषणासाठी रिअल-टाइम ऑपरेशन्स करण्यासाठी जबाबदार असलेल्या किमान 7 भारतीय राज्य लोड डिस्पॅच सेंटर्सना लक्ष्य करणारी संभाव्य नेटवर्क घुसखोरी पाहिली, असे फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे. (Hackers try to target power distribution centers in Ladakh)