गुरुग्राम : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येचा (Murder) आता पोलिसांनी खुलासा केला आहे. मोबाईल चोरीच्या (Mobile Theft) संशयावरून 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत सहभागी असलेल्या 4 आरोपींना अटक करून गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. खुनाच्या आरोपींनी सहा महिन्यांपूर्वी अजय नावाच्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह रेवाडीतील शेतात पुरला होता. हरियाणातील गुरुग्राममध्ये (Gurugram Haryana) घडलेल्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.
गुरुग्राम क्राईम ब्रँचने आरोपींच्या सांगण्यावरून अजयचा मृतदेह कियारेवाडीच्या शेतातून बाहेर काढला. अजय हा वजिराबाद परिसरात लॉन्ड्रीचे काम करायचा. मेडिकल स्टोअर चालकांना अजयने मोबाईल चोरल्याचा संशय होता, हे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले. या संशयातूनच त्यांनी अजयला इतकी मारहाण केला की त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या निशांत, अरुण, रुबम, अमित आणि अन्य एकाला गुन्हे शाखेने वजिराबाद येथून अटक केली आहे.
पोलिसांच्या क्राईम युनिट सेक्टर 40 मध्ये 20 वर्षीय तरुणाच्या हत्येची अशी घटना उघडकीस आली आहे, जिचं गूढ उकलण्यासाठी पोलिसांना सहा महिने लागले. ही घटना 12 ऑक्टोबर 2021 रोजी वजिराबाद भागात घडली होती. बालाजी मेडिकल स्टोअरच्या संचालकांनी मोबाईल चोरीच्या संशयावरून 20 वर्षीय अजयची काठीने बेदम मारहाण करुन हत्या केली. रेवाडी परिसरातील शेतात मृतदेह पुरुन ते पोलिसांची दिशाभूल करत होते. त्यानंतर क्राईम युनिट सेक्टर 40 ला हत्या प्रकरणाचा सुगावा लागला आणि पोलिसांनी खुनाचा खळबळजनक खुलासा केला.
20 वर्षीय अजय अचानक बेपत्ता झाल्याने गुन्हे शाखेत खळबळ उडाली होती. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अरुण, रुबल आणि अमित यांची गुन्हे शाखेने वारंवार चौकशी केली, मात्र प्रत्येक वेळी आरोपी पोलिसांची चलाखीने दिशाभूल करण्यात यशस्वी होत होते. त्यानंतर सायंकाळी उशिरा या घटनेतील चौथा आरोपी निशांत याची क्राईम ब्रँचने कसून चौकशी सुरू केली, तेव्हा निशांतने पुन्हा पुन्हा आपले म्हणणे बदलण्यास सुरुवात केली. पोलिसांचा संशय बळावू लागला. मग काय, तपास वाढला आणि 20 वर्षीय अजयच्या हत्येचे गूढ उकलले.
निशांतच्या कबुलीनंतर इतर तिघांचीही चौकशी करण्यात आली, त्यानंतर चारही मारेकऱ्यांनी खुनाची कबुली तर दिलीच, पण हत्येनंतर 24 तास मृतदेह घरात कसा ठेवला, याचंही गूढ दुसऱ्या रात्री उघडकीस आलं. या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने निशांत, अमित, अरुण आणि रुबम यांना अटक केली आहे. अजयचा मृतदेह आरामपूर येथील शेतातून जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.