चंदीगड | 30 नोव्हेंबर 2023 : घरात लग्नाचा माहोल, नव्या सुनेचा नुकताच गृहप्रेवश. लग्न नीट पार पडल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते. आजूबाजूचे लोकही नव्या सुनेला आशिर्वाद द्यायला आवर्जून येत होते. पण हसतंखेळतं घर अचानक शांत झालं, असा सन्नाटा पसरला की कोणाच्याही मनात धडकी भरावी. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नव्या सुनेने केलेल्या प्रतापामुळे लग्नघरात शोककळा पसरली. हरियाणातील रेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.
तेथे एका लुटारू वधूचे प्रकरण समोर आले आहे. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसात नववधू घरातून गायब झाल्याने एकच गोंधळ माजला. पण ती एकटीच गेली नाही, तर घरातील होतं नव्हतं ते सगळं मौल्यवान सामान, लाखो रुपयांचे दागिनेही घेऊन ती पळाली. तिचा हा प्रताप जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याप्रकरणी पीडित कुटुंबियांनी अखेर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.
धूमधडाक्यात झालं लग्न पण..
मिळालेल्या माहितीनुसार, बावल विधानसभेच्या टंकडी गावातील लक्ष्मीनारायण उर्फ राजकुमार शर्मा यांचा विवाह उत्तर प्रदेशातील तरुणीशी झाला होता. एका मध्यस्थाच्या माध्यमातून हे लग्न ठरले होते. राजकुमारने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घरच्यांनी मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पाडले होते. वधूसोबत तिचा भाऊ आणि वहिनीही आले होते. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते, आजूबाजूचे लोकही वधूला पाहण्यासाठी, तिला आशिर्वाद देण्यासाठी येत होते.
पहाटेच्या सुमारास भिंत ओलांडून नवी नवरी पसार
सगळं काही आनंदाच सुरू होतं, आलबेल होतं. पण लग्नाच्या तिसर्या दिवशी वधू गुपचूप पळून जाईल, हे कुटुंबातील कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. या घटनेनंतर संपूर्ण घराला धक्का बसला आहे. सासरच्यांनी वधूच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यापैकी कोणीच, काहीही बोलायला तयार नाही.
लाखोंचे दागिनेही पळवले
नवी नवरी पळाल्याने गावात एकच चर्चा सुरू आहे. पण ती काही एकटी पळाली नाही तर तिच्यासोबत तिने घरातील मौल्यवान वस्तू, लाखो रुपयांचे दागिनेही पळवून नेले. या संपूर्ण प्रकरणामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या घरात दोन दिवसांपूर्वी शहनाईचे सूर गुंजत होते, तिथे आता शांतता पसरली आहे. यानंतर पीडित कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यापोलिसांनी तपासासाठी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून सीसीटीव्ही ताब्यात घेतला असून त्या फुटेजमधून काही सुगावा मिळतो का याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलीस नववधूच्या शोधात व्यस्त आहेत मात्र तिने हे पाऊल का उचलले हे अद्याप कोणालाच समजलेले नाही. लुटारू वधूला लवकरात लवकर पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.