मुंबई : प्रभादेवीतील गिरणी कामगारांना मिळालेली म्हाडाची घरे स्वस्तात मिळणार म्हणून त्या 21 जणांनी आपली आयुष्यभराची कमाई दलालांना दिली. अशाप्रकारे सुमारे 2.30 कोटी रूपये घेतल्यानंतर देखील घरे काही मिळाली नसल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दादर पोलीसांनी या प्रकरणात सुनील घाटविसावे तसेच त्याची पत्नी सुजाता, प्रशांत जाधव, बबिता भंगारे, रवी शिगवण आणि सरस्वती लोकरे आदी सहा जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
2017 मध्ये आरोपी सुनील घाटविसावे याने आपली म्हाडा अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असल्याचे सांगत तक्रारदारांना फशी पाडले. म्हाडाचे सेन्चुरी बाजार येथील मिल कामगारांचे फ्लॅट बाजार भावापेक्षा स्वस्तात मिळवून देण्याचे आमीष दाखवल्याचे दादर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साठे यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले.
आरोपी सुनील घाटविसावेवर विश्वास ठेवून पीडब्ल्यूडी विभागात क्लार्क असलेल्या तक्रारदार दत्तप्रसाद बाईत ( वय 39 ) आणि त्याच्या नातेवाईकांनी एकूण 2.30 कोटी रूपये घाटविसावे याला दिले. एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान ही रक्कम त्यांनी आरोपी घाटविसावे याच्याकडे सुपूर्द केली. सुरक्षा म्हणून घाटविसावे याच्या तक्रारदारांनी करार देखील केला. परंतू अखेर शेवटपर्यंत घरे काही मिळाली नाहीत. जेव्हा तक्रारदारांनी पोलीस स्थानक गाठले.
असा विश्वास निर्माण केला
आरोपींनी आपल्यासह आपल्या नातलगांनाही प्रभादेवीतील सेन्चुरीबाजार म्हाडा कॉलनीत नेले आणि तेथील फ्लॅटही आपल्या दाखविल्याचे तक्रारदार दत्तप्रसाद बाईत यांनी सांगितले. आरोपीनी या सर्व तक्रारदारा म्हाडाच्या कार्यालयात नेऊन त्यांचे बायोमेट्रीक डीटेल्स जमा केले. त्यामुळे तक्रारदारांचा आरोपींवर चांगलाच विश्वास बसला आणि त्यांनी आनंदाने सर्व पैसे भरले.
सर्वसाधारण वर्गातील तक्रारदार
या प्रकरणातील सर्व तक्रारदार सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रकल्पबाधीत आहेत. त्यांना विकासकाने तीस लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली होती. ते पैसे त्यांनी स्वस्तात घर मिळत आहे म्हणून या आरोपींना दिल्याचे सांगण्यात येते. घाटविसावे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा संशय आहे. इतर सर्व जण त्याला मदत करीत होते असे उघडकीस आले आहे. आतापर्यंत पोलीसांनी 38 लाख रूपये हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. पोलीसांनी या प्रकरणात भादंवि कलम 406 , 409 , 420 आणि 34 गुन्हा दाखल केला आहे.