उन्नाव : त्याने तिला खोटी आश्वासने दिली आणि प्रेमाच्या आणाभाका घेत भुलवले. अखेर त्याच्यावर विश्वास ठेवून तिने आपले सर्वस्व त्याला अर्पण केले. त्याने तिला एका निर्जन ठीकाणी नेले आणि तिचा उपभोग घेतला आणि त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने तिच्या अंगावर दोन गाड्या घालून तिला संपवत ते नराधम पळून गेले होते. पोलीसांनी अखेर त्या दोन गाड्यांसह आरोपींना अटक केली आहे. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने या तरूणीच्या अंगावर गाडी घालून तो अपघात असल्याचा बनाव केला होता. परंतू पोलीसांनी हिसका दाखवताच आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
उत्तर प्रदेशातील सफीपूर ठाणा क्षेत्रातील कस्बा परिसरातील करूणा पांडे मार्केट परिसरात 23 फेब्रुवारीला दुपारी रस्त्यावर एका तरूणीचा मृतदेह सापडला होता. या तरूणीवर अतिप्रसंग घडल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी 302, 364 आणि 376 डी या भारतीय दंड विधान संहितेच्या कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत सफीपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी पिंटू रावत ( वय 19 ) आणि कैलाश रावत ( वय 19 ) यांना अटक केली. या प्रकरणातील दोन मोटारी कार देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपीने क्रुरतेचा कळस गाठला
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा आरोपीने क्रुरतेचा कळस गाठत हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पिंटूची चौकशी केली असता त्याने गावातील या तरूण मुलीशी प्रेम संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. 22 फेब्रुवारीला त्याने तिला मोबाईलच्या फोनच्या व्हॉटसअपवरून भेटण्यासाठी बद्री प्रसाद कॉलेज रोडवर बोलावले. त्याने त्याच्या चार चाकी गाडीत बसवले निर्जन ठिकाणी नेले. त्याने गाडीत तिच्याशी गप्पा मारीत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तेव्हा तिच्या आजोबांचा फोन त्याच्या मोबाईलवर आल्याने तो घाबरला. त्यावेळी या तरूणीने घरी जाण्यास नकार देत आपण दोघेही जण एकत्र पळून जाऊया अशी मागणी आरोपीकडे केल्याने त्याने थंड डोक्याने तिलाच संपवण्याचा प्लान रचला.
मित्राला कार घेऊन बोलावले
आरोपी पिंटू याने त्याचा मित्र रोहीतला ओम्नी कार घेऊन बोलावले, त्यानंतर या दोघांनी प्लान करून तिला संपविण्याचे ठरविले. करोवन बांधावर तिला आपल्या गाडीतून त्यांनी नेले आणि जशी ती गाडीतून उतरून रस्ता क्रॉस करेल तसे तिला ठोकर मारायची त्याने योजना आखली. आणि जशी ती तरूणी खाली गाडीतून उतरून खाली उतरली तशी आरोपी पिंटूने एक्सलेटर वाढवून तिला धडक मारली. त्यानंतर आरोपीचा साथीदार रोहीतने त्याच्या ओम्नी गाडीने तिला चिरडले आणि ते दोघे ही पसार झाल्याची कबूली आरोपीने पोलिसांना दिली आहे.