बंगलुरू : त्याच्या बाहेरख्याली पणाला कंटाळून त्याच्या दुसऱ्या पत्नीने घर सोडून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याने तिची मनधरणी करण्यासाठी तिला आपल्या संपत्तीतील वाटा देण्याचा निर्णय घेतला, मात्र वडीलांनी त्यास विरोध केल्याने त्याने वडीलांनाच संपविण्यासाठी त्यांच्याच हत्येची एक कोटीची सुपारी गुंडाना देत त्यांना संपविले. या प्रकरणी ३२ वर्षीय मणिकांता या तरूणाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.
मणिकांता याला त्याच्या वडीलांची मालमत्ता हस्तगत करायची होती. त्याच्या वडीलांबरोबर त्याचे पटत नव्हते. मणिकांता याला २०१३ मध्ये एका खुनाच्या प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे त्याचे वडील पी.एन.नारायण स्वामी ( वय ७० ) यांच्याशी त्यांचे बिनसले होते. पी.एन.नारायण स्वामी यांची त्यांच्या अपार्टमेंटजवळच १३ फेब्रुवारीला बाईकवर आलेल्या दोघा मारेकऱ्यांकडून हत्या करण्यात आली होती.
स्वामी यांच्या पत्नीने या प्रकरणी फिर्याद नोंदविली होती. या खून प्रकरणात मणिकांता हा एक साक्षीदार होता. मणिकांताचा पूर्व इतिहास गुंडगिरीचा असल्याने पोलिसांनी त्याला संशयावरून अटक केली. मणिकांताने त्याच्या पहिल्या पत्नीची २०१३ मध्ये हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणात त्याला अटक केली होती, परंतू २०२० मध्ये त्याला निर्दोष सोडून दिले होते. नंतर त्याने अर्चना या दुसऱ्या महिलेशी लग्न केले. कॉल डीटेल्स रेकॉर्ड तपासले असता आणि इतर तांत्रिक पुराव्यामुळे पोलिसांनी मणिकांता याला स्वत:च्या वडीलांच्या हत्ये प्रकरणात अटक केली.
तपासात असे उघडकीस आल की जेव्हा तो तुरूंगात होता, तेव्हा त्याची दोन कॉन्ट्र्क्ट किलरशी ओळख झाली. शिवकुमार २४ आणि आदर्श २६ या दोघांनी त्याने स्वत:च्या वडीलांच्या हत्येची सुपारी दिली. एक कोटी रूपायांपैकी एक लाख त्याने त्यांना अडव्हान्स दिले. त्यानूसार शिवकुमार आणि आदर्श याने मणिकांताच्या वडीलांवर पाळत ठेवत त्यांची घराजवळच पार्कींग लॉटमध्ये १३ फेब्रुवारीला हत्या घडविली, यावेळी मणिकांता हा घरीच होता. त्याने वडीलांना दवाखान्यात नेले आणि त्यांच्यावर अंत्य संस्कार देखील केले.
पोलिस तपासात असे उघड झाले की मणिकांताच्या दुसऱ्या लग्नानंतर त्याची पत्नी अर्चना घरात नांदायला तयार होईना, मणिकांता याचे अन्य एका महिलेशी संबंध असल्याचा आरोप करीत तिने घरातून बाहेर पडण्याची धमकी दिली, तेव्हा तिला रोखण्यासाठी मणिकांताने तिला प्लॉट , फ्लॅट आणि पंधरा लाख कॅश आणि १.७ एकर जमिन देण्याचे आश्वासन दिले. हे जेव्हा त्याच्या वडीलांना कळले तेव्हा त्यांनी कोणतीही संपत्ती मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने स्वत:च्या वडीलांच्या हत्येची सुपारी देण्याचा निर्णय घेतला.