उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण तालकटोरा परिसरातील आहे. खडरा परिसरात राहणाऱ्या इझार अहमद याचा वर्षभरापूर्वी फरीना बानो हिच्यासोबत विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती पत्नीमध्ये भांडणे सुरू झाली. हे प्रकरण इतके वाढले की मे 2023 मध्ये फरीना बानो सासर सोडून माहेरी निघून गेली. पण, जाण्यापूर्वी तिने असा गुन्हा केला होता की ज्याचा कोणालाच सुगावा लागला नव्हता. मात्र, तिच्या एका शुल्लक चुकीमुळे तिचे बिंग फुटले.
फरीना बानो हिला चैनीचे जीवन जगायचे होते. याच कारणावरून तिचे नवऱ्यासोबत सतत भांडण होत असे. चैनीचे जीवन जगण्यासाठी तिने मोठे षड्यंत्र रचले. पती जिवंत असतानाचा फरीना हिने पती इझार याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र बनविले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे तिने एका फायनान्स कंपनीने कर्जासाठी अर्ज केला. फायनान्स कंपनीने तिचा अर्ज मजूर केला. तिला कर्जाचे पैसे मिळाले. पैसे मिळाल्यानंतर ती पती इझार याचे घर सोडून माहेरी गेली आणि तिथे चैनीचे जीवन जगू लागली.
माहेरी गेलेली फरीना हिने कर्जाचे काही हप्ते भरले. पण, नंतर तिने हप्ते भरले नाहीत. त्यामुळे फायनान्स कंपनीचे कर्मचारी इझार याच्या घरी पोहोचले. त्याने अधिक चौकशी केली असता फरीना हिने त्याच्या मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र बनवून कर्ज घेतल्याचे उघड झाले. त्याने थेट पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे इझार याने न्यायालयाकडे मदत मागितली.
इझार याने न्यायालयात आपली बाजू मांडताना पत्नी फरीना हिने बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवून फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतल्याचे सांगितले. आता ती हप्ता भरण्यास सक्षम नाही. फायनान्स कंपनी माझ्याकडून हप्ते मागण्यासाठी आली. त्यावेळी फरिनाच्या कृत्याबद्दल मला समजले तेव्हा धक्का बसला. तिने हे कर्ज फसवणुकीने घेतले होते. त्यामुळे तिच्यावर कारवाई करावी अशी विनंती त्याने न्यायालयात केली.
न्यायालयाने इझार याची बाजू ऐकून पोलिसांना आरोपी फरीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी फरिना हिच्याविरुद्ध तसेच कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.