Abhishek Ghosalkar | ‘देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या’; अभिषेक घोसाळकरांवरील गोळीबारांनंतर संजय राऊतांची मागणी

| Updated on: Feb 08, 2024 | 10:43 PM

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वर गोळी झाडल्याची माहित समोर आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Abhishek Ghosalkar | देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या; अभिषेक घोसाळकरांवरील गोळीबारांनंतर संजय राऊतांची मागणी
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आरोपी मॉरिस भाई याने फेसबुक लाईव्ह करत गोळ्या घातल्या आहेत. या घटनेने दहिसर परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मारल्यावर आरोपी मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या मारून घेतल्याची माहिती समजत आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे.म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

 

मॉरीस भाई आणि अभिषेक बाजूबाजूलाच

या व्हिडिओत त्यांच्याबाजूला मॉरीस भाई बसला होता. यावेळी मॉरीस भाई बोलताना दिसत आहे. अनेक लोकांना आश्चर्य वाटेल. जी गोष्ट युनिटीसाठी होते. आयसी कॉलनीच्यासाठी होत आहे. आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे. आज आम्ही ठरवलंय की साडी वाटायची, राशन वाटायचं, अभिषेकभाई आणि आम्ही नाशिक ट्रिपच्या बसेस करायचं ठरवलं आहे, असं मॉरीसभाई म्हणतो.

अभिषेक काय म्हणाले?

त्यानंतर अभिषेक घोसाळकर बोलताना दिसत आहेत. आता कसं आहे की, आताच आपण सांगितलं की आपण एकत्र येणार आहोत. त्यामुळे चांगला दृष्टीकोण ठेवून आणि एकत्रित रित्या राहून एक चांगलं काम करायचं आहे. (मॉरीस भाई उठून जातो) मला वाटतं आपण चांगल्या कारणाने पुढे गेलं पाहिजे. लोकांचं भलं पाहिलं पाहिजे. लोकांचा फायदा कोणत्या गोष्टीत आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं आज एक चांगला निर्णय मॉरीस भाईने घेतला आहे. आज साडी, फळ आणि धान्य वाटण्याचं काम करण्यात येणार आहे, असं अभिषेक घोसाळकर म्हणतात. तेवढ्यात मॉरीस भाई येतो. आणि आम्ही दोघं हे एकत्रितपणे करणार असल्याचं म्हणतो. त्यावर अभिषेक स्मित हास्य करताना दिसत आहेत. त्यानंतर अभिषेक घोसाळकर उभं राहायला उठतात.

अन् गोळ्या घातल्या…

अभिषेक घोसाळकर उठत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दिसतो. मोबाइलकडे पाहत असतानाच त्यांना अत्यंत जवळून चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यांच्या पोटावर गोळ्या लागल्या. गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर ठेवून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मन विचलित करणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.