बंगळुरू : एका ऑटोरिक्षाच्या मागील बाजूस असलेल्या ‘किंग कोहली’ (King Kohli) या शब्दांमुळे बंगळुरू पोलिसांना 82 वर्षीय महिलेच्या हत्येमागील (murder of old woman) गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत केली आहे. कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महालक्ष्मीपुरम येथील रहिवासी कमला एन राव उर्फ कमलम्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला होता, जिथे त्या एकट्याच रहात होत्या. हात पाय बांधलेले आणि तोंड टेपने झाकलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह या आठवड्याच्या सुरुवातीला घरात सापडला.
कर्ज चुकवण्याच्या नादात केली वृद्ध महिलेची हत्या
हे प्रकरण नंतर उघडकीस आले असले तरी 27 मे रोजी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून सिद्धाराजू सी एम (वय 34), प्लंबर आर अशोक (वय 40), लागेरे आणि सी अंजनमूर्ती (वय 33) कामाक्षीपल्य अशी आरोपींची नावे असल्याचे समजते. त्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. कर्ज फेडण्याच्या प्रयत्नात आरोपींनी कट रचला आणि वृद्ध महिलेची हत्या केली, असे डीसीपी शिव प्रकाश देवराजू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारस “अशोक हा कमला यांच्या घरी प्लंबिंगच्या कामासाठी गेला होता, तेव्हा त्या घरात एकट्याच रहात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. काही दिवसांपूर्वी अशोकने एका बारमध्ये इतर आरोपींसमोर याचा खुलासा केला. त्यानंतर सिद्धाराजू यांनी कर्ज फेडण्यासाठी कमलाचे सोन्याचे दागिने लुटण्याचे मान्य केले.’
27 मे रोजी सकाळी, आरोपींनी अंजनमूर्ती याच्या ऑटोरिक्षाची रजिस्ट्रेशन प्लेट काढून टाकली. मात्र त्या रिक्षाच्या मागील बाजूस ‘किंग कोहली’ असे लिहीले होते. नंतर त्यांनी रिक्षाचा वापर करून कमला यांच्या घराची रेकी केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी दुसरी ऑटोरिक्षा भाड्याने घेतली आणि ते कमला यांच्या घरी गेले व गॅरेजची जागा भाड्याने देऊ शकता का, याची चौकशी त्यांनी केली.
एकदा घरात प्रवेश केल्यावर आरोपींनी कमला यांचे हातपाय बांधले, तिचे तोंड टेपने झाकले आणि तिची हत्या केली. यावेळी अशोक घराबाहेर पहारा देत उभा होता, असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून त्यांच्या हालचाली टिपल्यानंतर आरोपींचा माग काढला. “आम्ही कमला यांच्या निवासस्थानाजवळील दृश्यं तपासली असता पहाटेच्या वेळी त्या रस्त्यावर एकच ऑटोरिक्षा अनेक फेऱ्या मारताना दिसली. त्या रिक्षावर‘किंग कोहली’असे शब्द लिहील्याचे, मात्र रिक्षाला रजिस्ट्रेशन नंबर नसल्याचे आम्हाला आढळले,” असे पोलिसांनी नमूद केले.
“ त्यामुळे आम्ही त्या रिक्षाच्या आधीच्या मूव्हमेंट्सचा शोध घेतला असता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंजनमूर्ती रिक्षाची नंबर प्लेट काढताना दिसला. लवकरच, आम्हाला ऑटोरिक्षाचा नोंदणी क्रमांक सापडला आणि त्याच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. ‘किंग कोहली’ या शब्दांनी आम्हाला वाहनाचा आणि पर्यायाने आरोपींचा शोध घेण्यास मदत केली,” असेही पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले.
त्यानंतर पोलिसांनी म्हैसूर येथे असलेल्या सर्व आरोपींना अटक केली. अशोकने आयपीएल सट्टेबाजीत पैसे गमावले आणि त्याच्यावर काही कर्जही होती, असेही तपासात उघड झाले आहे.