मुंबई – मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यापासून विविध संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सुरूवातीला मोहिम राबिविली. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध प्रयत्न आयडीया वापरल्या. संजय पांडे यांनी पदभार स्विकारल्यापासून चांगले निर्णय घेतल्यामुळे ते चर्चेत आहेत.आज मुंबई प्रेस क्लब (Mumbai Press Club) येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांची यादी सांगितली. मात्र यावेळी ते असेही म्हणाले की, ड्रग्स तस्करी (Drug Smugglers) सगळ्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ड्रग्स तस्करीमुळे तरुणाई अधिक बिघडत चालली आहे. आपला समाज ड्रग्समुक्त व्हायला हवा. त्यासाठी ‘मुंबई पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यासाठी कारवाया करीत आहे. तसेच ड्रग्स हे ड्रग्स असतं त्यामुळे त्याच्यावरती कारवाई व्हायला हवी असंही संजय पांडे यांनी सांगितलं.
दोन वर्षात ड्रग्सविरोधी कारवायांचा धडाका
मुंबई शहरात 94 पोलीस ठाणे आहेत. अवाढव्य शहरात ड्रग्सविरोधात अंमली पदार्थ विरोधी पथक कारवाया करीत आहे. पण अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे अवघ्या 130 अधिकाऱ्यांच मनुष्यबळ आहे. त्यामुळे एवढ्या कमी मनुष्यबळात मुंबई ड्रग्समुक्त कधी होईल, या चर्चेने आता जोर धरला आहे. मुंबईत 94 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने ड्रग्सविरोधात कारवाया होणं अपेक्षित आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात ड्रग्ससंदर्भात होणाऱ्या कारवायाचं प्रमाण अगदीच कमी आहे. दुसरीकडे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागच्या दीड दोन वर्षात ड्रग्सविरोधी कारवायांचा धडाका लावला आहे. गेल्या आठवड्याभरातच अंमली पदार्थ विरोधी पथकाने जवळपास 8 कोटी रुपयाचं ड्रग्स पकडलं असून अटकेची कारवाई केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाची 5 पथके कारवाईसाठी सज्ज
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात सध्या एक डीसीपीसह 130 अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे एकूण 5 युनिट आहेत. यामध्ये आझाद मैदान युनिट, वरळी युनिट, वांद्रे युनिट, घाटकोपर युनिट आणि दहिसर युनिट अशी पाच युनिट आहेत. युनिटमधून मागच्या वर्षभरात सातत्याने ड्रग्सविरोधात कारवाया झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतून ड्रग्स कायमच संपवायचं असेल तर अंमली पदार्थ विरोधी पथकाची व्याप्ती वाढायला हवी. शिवाय स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर ड्रग्सविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया व्हायला हव्यात. तरच ड्रग्स पूर्णपणे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. मात्र सध्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे असणार मनुष्यबळ पाहता ड्रग्स संपवण्याच्या धोरण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त काय पाऊल उचलतात हे महत्वाचं आहे.