लखनौ : लखनौमधील जहांगीराबाद स्थित आदर्श रामस्वरुप इंटर कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉलेजच्या प्राचार्यां (Principal)नी एका विद्यार्थ्याच्या कानशीलात लगावली होती. कॉलेजच्या कँपसमध्ये आज सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. याचा बदला विद्यार्थ्याने प्राचार्यांवर गोळ्या झाडून (Firing) घेतला आहे. या हल्ल्यात प्राचार्य जखमी (Injury) झाले आहेत. राम सिंह वर्मा असे जखमी प्राचार्यांचे नाव आहे.
जखमी प्राचार्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे.
आरोपी विद्यार्थी बारावी इयत्तेचा विद्यार्थी आहे. आरोपीने एकूण तीन गोळ्या प्राचार्यांवर झाडल्या. यात प्राचार्यांच्या डोक्याला मार लागला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.
आरोपी विद्यार्थ्याने शुक्रवारी एका विद्यार्थ्याला मारहाण केली होती. या कारणातून प्राचार्यांनी आरोपी विद्यार्थ्याच्या थोबाडात मारले होते. याचाच राग विद्यार्थ्याच्या मनात सळसळत होता. आरोपीने प्राचार्यांना गोळी मारण्याची धमकीही दिली. मात्र प्राचार्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही.
शनिवारी सकाळी प्राचार्य नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आले. यावेळी आधीपासून दबा धरुन बसलेल्या आरोपीने प्राचार्यांवर गोळ्या झाडल्या. सदर विद्यार्थी दररोज कॉलेजमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडण करायचा, तसेच शिक्षकांसोबतही उद्धट वागायचा, असे पोलीस तपासात कळाले.
पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच त्याच्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.