वाशिम : शेतीवरून झालेल्या वादातून पतीने पत्नी आणि दोन मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना वाशिमच्या इचोरी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी आणि मुले गंभीर जखमी झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, आसेगांव पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. इचोरीच्या नंदू घोडके याचा पत्नीच्या शेती नावावर करून देण्यावरून वाद झाला. याच वादातून आरोपी नंदू घोडकेने झोपेत असलेल्या पत्नीवर आणि दोन मुलांवर कुऱ्हाडीने वार केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रसंगी आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
वाशीमच्या मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात बापाने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी आणि 10 वर्षाचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर वाशिममधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदू आत्माराम घोडके हा व्यसनाधीन होता. त्यामुळे त्याचे वयोवृद्ध वडील आत्माराम घोडके यांनी आपल्या दोन नातवांना जमिनीचे वारसदार नोंदवले होते. यात हरिओम घोडके हा आरोपी नंदूचा मुलगा आणि दुसरा वारसदार म्हणून आत्माराम यांनी मुलीच्या मुलाचे नाव नोंदवले होते. यावरून नंदू घोडके हा दारू पिऊन वडील, पत्नी आणि मुलाशी नेहमी वाद घालायचा.
नेहमीप्रमाणे 6 तारखेला सायंकाळी असाच वाद झाला. त्यानंतर सर्वजण झोपी गेले, मात्र नंदूच्या मनात राग भरलेला होता. यातून त्याने रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पुन्हा वाद घातला. यानंतर पत्नी रेखा घोडके आणि दोन मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. आरडाओरडा ऐकून शेजारी धावत गेल्यानंतर नंदूने तिथून पळ काढला. तीनही जखमींना वाशिम येथे उपचारासाठी दाखल केले असता मोठा मुलगा हरिओम घोडके याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.