जयपूर | 1 सप्टेंबर 2023 : रक्षाबंधनाचा (Raksha bandhan) सण नुकताच पार पडला. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा हा सण आनंद घेऊन येतो. मात्र याच सणाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एका इसमाने स्वत:चे जीवन संपवून घेतले. मृत इसम हा रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या सासरी, पत्नीला आणण्यासाठी गेला होता, मात्र तिने सासरी परत येण्यास नकार दिला. यामुळे रागावलेला , निराश झालेला तरूण घरी परत आला आणि त्याने खोलीत जाऊन गळफास लावून घेत आयुष्य (ended his life) संपवलं. हे पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
नेमकं काय झालं ?
मृत इसमाचे नाव कुलदीप आहे. त्याच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप हा रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या सासरी, करीमपूर येथे गेला होता. मात्र तेथे सासरच्या लोकांशी त्याचा काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास तो घरी आला आणि झोपून गेला. सकाळी उठल्यावर पाहिलं तर काय, त्याने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली. ते पुढील तपास करत आहेत.
पत्नीने सासरी येण्यास नकार दिला, म्हणून उचललं टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी कुलदीप याचा विवाह करीमपूर गावातील तरूणीशी झाला. मात्र दीड महिन्यांपूर्वी त्याची पत्नी माहेरी राहण्यास गेली होती. रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी तो पत्नीला आणायला सासरी गेला होता पण त्याच्या पत्नीने घरी परत येण्यास नकार दिला. त्यानंतर कुलदीप घरी आला व त्याने टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवलं. याप्रकरणी पोलिस धिक तपास करत आहेत.