पत्नीच्या मृत्यूमुळे शोकव्हिवल झालेल्या पतीने पोलिसांत जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी लागलीच तपासही सुरू केला, मात्र तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. ज्या पतीने खुनाची फिर्याद नोंदवली, तोच खरा खुनी असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनाही मोठा धक्का बसला. उच्चशिक्षित पतीने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केला, एवढेच नव्हे तर तिच्या मृत्यूनंतरही तिला इलेक्ट्रिक शॉकही दिल्याते समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील रणपिसे ( 26) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील रांजणगाव सांडस येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल रणपिसे (23) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आला होता. आरोपी स्वप्नील उच्चशिक्षित आहे. सात महिन्यांपूर्वीच त्याचे शीतलशी लग्न झाले होते. त्याचा स्वभाव संशयी असून लग्नासाठी मुली पहात असतानाही त्याने अनेक मुलींकडे पूर्वायुष्याबाबत खोदून खोदून चौकशी केली होतीी. त्याच्या याच स्वभावामुळे अनेक मुलींनी त्याला लग्नासाठी नकार दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. अखेर त्याचे व शीतलचे लग्न झाले, पण त्याचा संशयी स्वभाव काही गेला नाही.
पत्नी घरात एकटी असताना..
खुनाची घटना घडली, त्यादिवशी ३ जुलै रोजी शीतल घरात एकटी होती. तिचे सासू-सासरे आणि नवरा कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी स्वप्नील घरी आला तेव्हा दरवाजा बंद होता, कोणीच उघडला नाही. मोबाईल फोनही उचलला नाही. त्यामुळे स्वप्नीलने चुलतभावाला रणजितला बोलवून घेतले. घराच्या पाठीमागील दरवाजाने दोघेजण आत गेले. तेव्हा शीतल घरात बेशुद्ध पडली होती. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती. तर अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने शॉक दिला होता. शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. शीतलचा खून चोरीचा उद्देशातून झाल्याची प्राथमिक माहिती तपासात उघडकीस आली. नवविवाहीतेचा खून झाल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले. घरातल्यांचीही चौकशी केली असता पोलिसांना स्वप्नीलचं वागणं वेगळं वाटल्याने त्याच्यावर संशय बळावला. अखेर त्यांनी त्याला खाक्या दाखवत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. चारित्र्याच्या संशयातूनच आपण पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.