बारमेर : राजस्थानमधील बारमेर (Barmer) जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांतच पत्नीची निर्दयीपणे हत्या (Murder) केली. नंतर त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. त्यासाठी त्याने पाण्याच्या टाकीत उडी मारली मात्र तो बचावला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती ऐकून सर्वजण सुन्न झाले. हे धक्कादायक प्रकरण बारमेर जिल्ह्यातील धनौ पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
धनौ ठाणप्रभारी यांनी सांगितले की, रविवारी ठाणे परिसरातील पुंजासर गावात ही घटना घडली. बिहारमध्ये राहणारी 25 वर्षीय शबाना खातून हिचा विवाह येथील 60 वर्षीय सलीमसोबत झाला होता. हा विवाह एका दलालाच्या माध्यमातून झाला होता. मात्र या बेजोड विवाहामुळे शबाना आणि सलीममध्ये वाद सुरू झाला. लवकरच या वादाचे रूपांतर द्वेषात झाले. लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांनी सलीमने रविवारी सकाळी शबानाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. यामुळे शबाना हिचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीवर बारमेर येथे सुरू उपचार
त्यानंतर सलीमने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने आत्महत्या करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उडी मारली. मात्र लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. या घटनेत सलीम गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम सांचोर येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती पाहता त्याला बारमेरच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हत्येची माहिती मिळताच धानाळ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवला. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक धर्मेंद्र दुकिया घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करून पुरावे गोळा केले आहेत. याबाबत पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली.
शबानाच्या नातेवाइकांनी बिहारमधून येण्यास नकार देत मृतदेह सासरच्या लोकांच्या ताब्यात देण्यास सांगितले आहे. शबाना ही दलालामार्फत लग्न करण्यासाठी येथे आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र वराच्या वयामुळे दोघांमध्ये वाद झाला. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत