तीरपूर : अलीकडच्या काळात लोकांचा सोशल मीडियातील वावर वाढला आहे. तरुण-तरुण मोठ्या प्रमाणावर इंस्टाग्रामचे फॅन झाले आहेत. इतकेच नव्हे तर विवाहित लोक देखील इंस्टाग्रामच्या प्रेमात पडले आहेत. इंस्टाग्रामचा अतिवापर मात्र परिणामकारक ठरत आहे. तरुणाईच्या बाबतीत शिक्षणावर परिणाम करणारा ठरतोय, तर विवाहित दांपत्यामध्ये हाच इंस्टाग्रामचा वापर कळीचा मुद्दा बनतो आहे. इंस्टाग्रामच्या अतिवापरातून नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
पत्नी जास्त वेळ इंस्टाग्रामवर व्यस्त असते, तिला वारंवार समज देऊनही तिने इंस्टाग्रामचा नाद सोडला नाही. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला अत्यंत क्रूर पद्धतीने धडा शिकवला. पतीने मागेपुढे न पाहता पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.
तामिळनाडूच्या तीरपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. सोशल मीडियाचा अतिवापर एका महिलेच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चित्रा हत्या केलेल्या महिलेचे नाव असे आहे. हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. चित्राला इंस्टाग्रामवर रिल्स बनवून त्या सोशल मीडिया शेअर करण्याची सवय होती. तिचा हा छंद रोखण्यासाठी पतीने अनेक प्रयत्न केले. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे.
नुकत्याच झालेल्या वादात पतीला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने घरातील शाल घेऊन पत्नीचा गळा आवळला. त्यामुळे गुदमरलेल्या पत्नी बेशुद्ध पडली. ते पाहून भेदरलेल्या पतीने पळ काढला.
नंतर पतीने मुलीला कॉल करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर विवाहित मुलीने माहेर गाठले, तेव्हा तिला घरामध्ये आई मृतावस्थेत आढळले. त्यावेळी तिने पोलिसांना खबर दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आणि आरोपी अमृतलिंगमला अटक केली.
इंस्टाग्रामवर चाहते वाढल्यानंतर चित्राने अभिनयामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने चेन्नईमध्ये जाऊन अभिनय प्रशिक्षण केंद्रामुळे चौकशी देखील केली. तिच्या अभिनयातील करिअरला पतीने मात्र विरोध केला होता.
इंस्टाग्रामवर तासन्तास पती-पत्नी व्यस्त असल्याचे पाहून त्याचा पारा नेहमीच चढलेला असायचा. पत्नीने संसारात लक्ष घालावे अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे अभिनयाची इच्छा पत्नीने व्यक्त केल्यानंतर त्याचा राग भलताच अनावर झाला आणि त्याने शाल घेऊन पत्नीचा गळा आवळला.