व्येंकटेश दुडमवार, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली / 18 जुलै 2023 : जावई आणि मुलाने मारहाण केल्याने मुलीकडे रहायला गेलेल्या पत्नीची पतीने हत्या केल्याची घटना गडचिरोलीतील कोचीनारा गावात घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावनातून अटक केली आहे. प्रीतराम भक्तू धकाते असे अटक आरोपीचे नाव आहे. धकाते साधूच्या वेशात मथुरेत लपून बसला होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. कोरची पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात भादवि कलम 302, 226, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीची पत्नी पत्नी रेखा धकाते हिला जावई आणि मुलाने मारहाण केली होती. यानंतर महिला आपल्या मुलीकडे श्यामबाई देवांगण हिच्याकडे रहायला गेली होती. याच रागातून पत्नी मुलीसह जंगलात सरपण गोळा करायला गेली असताना पतीने तिची हत्या केली. यावेळी आईच्या बचावासाठी मध्ये पडलेल्या मुलीलाही आरोपीने जखमी केले. तसेच सोबत असलेल्या महिलांनाही जीवे मारण्याची धमकी देत याबाबत कुणाशी वाच्छता न करण्याचे दरडावले.
घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. जखमी मुलीलाही उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. यानंतर पोलिसांनी धकातेवर गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. पंधरा दिवस पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मोबाईल लोकेशनवरुन आरोपी उत्तर प्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल लोकेशनवरुन पोलीस उत्तर प्रदेशातील मथुरेत दाखल झाले.
तेथे आरोपीचा फोटो दाखवून शोध सुरु केला असता आरोपी ललित आश्रम परिसरात साधूच्या वेशात राहत असल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी तात्काळ ललित आश्रम गाठत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीला अटक करत गडचिरोलीत आणले. साधू, दारुडा, रिक्षाचालक आणि चणे विक्रेता अशी वेशभूषा करत पाच दिवस पोलिसांनी आरोपीवर पाळत ठेवली. मग संधी मिळताच आरोपीवर झडप घातली.
पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर आणि पोलीस हवालदार तेजराम मेश्राम, पोलीस शिपाई नरेंद्र धोंडने, शिवशंकर भालेराव यांनी सदर कारवाई केली आहे.