जोशपूर : छत्तीसगड राज्यातील जोशपूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. होळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी एका मद्यपीने आपल्या घरामध्ये दारू आणून ठेवली होती. ती दारू पतीला न विचारताच पत्नी प्यायली. त्यावरून पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामध्ये संतप्त झालेल्या पतीने पत्नीची दांड्याने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर दुखापत होऊन पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
दारू प्यायल्यामुळे पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या पतीने पत्नीला उपचारासाठी स्वतःच रुग्णालयात नेले होते. दुर्दैवाने मारहाणीमध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे पत्नीचा प्राण वाचू शकला नाही. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शांतीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपीने शुल्लक कारणावरून पत्नीला जिवंत मारल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले असून, आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
हत्या झालेल्या महिलेचे नाव ललिता एक्का असे असून, तिचे पहिले लग्न झाले होते. मात्र पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याने तिने आरोपी पती बबलू राम याच्यासोबत दुसरे लग्न केले होते. बबलू हा ललितापेक्षा खूप लहान होता. बबलू अवघा वीस वर्षे वयाचा असून त्याला दारूचे प्रचंड व्यसन आहे.
याच व्यसनामुळे त्याच्या वाट्याला ठेवलेली दारू पत्नी प्यायल्यामुळे तो प्रचंड संतापला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण करीत तिचा प्राण घेतला. बबलू ज्यावेळी दारू पिऊन घरी यायचा, त्यावेळी त्याचे आणि ललिता या दोघांचे जोरदार भांडण व्हायचे. अशाच भांडणाने अखेर ललिताचा प्राण घेतला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.