जयपूर : दोन महिन्यांपूर्वी एका बाईक अपघातात एका महिलेसह तिच्या दिराचा मृत्यू झाला होता. सुरवातीला या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मात्र या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक खुलासा झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. विम्याचे 1.90 कोटी रुपये हडपण्यासाठी पतीने पत्नीची हत्या करुन अपघाती मृत्यूचा बनाव केल्याचे उघड झाले. राजस्थानमधील जयपूरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
5 ऑक्टोबर रोजी आरोपी महेश चंदने पत्नी शालू हिला भाऊ राजूसोबत बाईकवरून मंदिरात जाण्यासाठी सांगितले होते. पती इतक्या आग्रहाने आपणाला सांगतोय हे पाहून शालू हिने तिच्या दिरासोबत मंदिरात जाण्यास तयारी दर्शवली.
पतीच्या सांगण्यावरून शालू ही पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मंदिरात निघाली होती. याचदरम्यान त्यांच्या दुचाकीला एका स्पोर्ट्स कारने जोरदार धडक दिली. या अपघातात शालूचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या राजू याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरोपी महेश चंदने पत्नीचा अपघाती मृत्यू घडवून विम्याचे पैसे लाटण्याचे कारस्थान रचले होते. त्याच्या या कटात दुर्दैवाने भाऊ राजू देखील मरण पावला. पैशांसाठी केलेल्या या कुटील कारस्थानाचे दोन बळी गेल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुरुवातीला हा अपघात असल्याचे पोलिसांच्याही निदर्शनास आले होते. मात्र घटनेचा कसून तपास करण्यात आल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.
आरोपी महेश चंदने पत्नीला जिवे मारण्याचा कट यशस्वी करण्यासाठी सराईत गुंडाची मदत घेतली होती. पत्नीला मारण्याच्या बदल्यात सराईत गुंडाला साडेपाच लाख रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आली होती. चंदने पत्नीच्या नावाने 40 वर्षांसाठी विमा काढला होता.
विमा कंपनीच्या नियमानुसार पत्नीच्या अपघाती मृत्यूसाठी एक कोटी 90 लाख रुपये तर नैसर्गिक मृत्यूसाठी एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती. त्यामुळेच महेश चंदने सराईत गुंडाच्या मदतीने शालूच्या अपघाती मृत्यूचा प्लान बनवला होता.
या प्लानसाठी आरोपीने सराईत गुंड मुकेश सिंह राठोड याला सुपारी दिली होती. राठोडने या हत्येचा प्लान यशस्वी करण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी मागितली होती. त्यापैकी साडेपाच लाख रुपयांची आगाऊ रक्कम राठोडला देण्यात आली होती, अशी माहिती डीसीपी वंदिता राणा यांनी दिली.
आरोपी महेश चंद आणि शालू या दोघांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. दोघांना एक मुलगी देखील आहे. लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांच्यामध्ये भांडण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शालू माहेरी राहायला गेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालू हिने 2019 मध्ये महेश विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार देखील नोंदवली होती. पुढच्या काळात महेशने वाद शांत झाल्याचे चित्र उभे करून शालूचा विमा काढला होता. मात्र त्याच्या डोक्यातील गुन्हेगारी कट काही मागे पडला नव्हता. गुंडाच्या मदतीने त्याने हा कट अखेर यशस्वी केला.