उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातून एक हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जिथे विवाहबाह्य संबंधामुळ पतीने त्याच्याच पत्नीच्या प्रियकराला गोळ्या घातल्या. या घटनामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री उशिरा गावात गोळीबार झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती. त्या तरूणाला गोळी मारल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पत्नीच्या प्रियकरावर गोळ्या झाडण्याचे हे प्रकरण कन्नौजमधील गुरसहायगंज कोतवाली भागातील विशंभरपूर गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गावात राहणाऱ्या धीरज नावाच्या इसमाच्या पत्नीचे त्याच गावातील एका दुसऱ्या तरूणाशी विवाहबाह्य संबंध होते. लपूनछपून हे प्रकरण सुरू होते. मात्र 15-20 दिवसांपूर्वी या अवैध नात्याची कुणकुण धीरजला लागली. त्याच्या पत्नीला तिचा प्रियकर सारखा फोन करायचा, मात्र धीरजला हे सजल्यानंतर त्याने त्या तरूणाची भेट घेऊन समज दिली आणि बायकोला फोन करू नकोस असेही बजावले. मात्र तरीही तिचा प्रियकर काहीच ऐकत नव्हता. याच मुद्यावरून धीरज आणि त्याच्या पत्नीचा प्रियकर या दोघांमध्ये रविवारी कडाक्याचे भांडण झाले.
या वादामुळे संतापलेला धीरज तसाच रागाच्या भरात त्या तरूणाच्या घरी गेला आणि त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत तो तरूण गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. तो मरण पावला असे समजून धीरजने घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि त्या तरूणाला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं