Abhishek Ghosalkar’s murder : मी त्याला… तुरुंगातून सुटल्यावर मॉरीस बायकोला काय म्हणायचा?; धक्कादायक माहिती काय?

| Updated on: Feb 09, 2024 | 2:26 PM

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे. येथील एक गुंड मॉरीसभाई याने त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे अभिषेक हे जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे बोरिवली आणि दहिसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अभिषेक यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Abhishek Ghosalkars murder : मी त्याला... तुरुंगातून सुटल्यावर मॉरीस बायकोला काय म्हणायचा?; धक्कादायक माहिती काय?
Follow us on

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : मॉरीसभाई नावाच्या गुंडाने काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. फेसबुक लाइव्ह करत मॉरीस याने थेट अभिषेक यांना गोळ्या घातल्या. त्यामुळे अभिषेक घोसाळकर हे जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून आणि पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मॉरीस याच्या बायकोची चौकशी केली. तिच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी मॉरीसच्या बायकोची चौकशी केली. तिच्याकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. बलात्कार आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मॉरीस हा तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो अभिषेक यांच्यावर डुख धरून होता. अभिषेक यांना मी सोडणार नाही, असं तो त्याच्या बायकोला वारंवार म्हणायचा, असं सूत्रांनी सांगितलं. अभिषेक यांना ठार मारण्याचं त्याने ठरवलंच होतं. त्यामुळेच त्याने आधी अभिषेक यांच्याशी गोड बोलणं सुरू केलं. त्यांच्याशी मैत्री केली आणि नंतर त्यांचा काटा काढल्याची माहिती समोर येत आहे.

काय घडलं ?

हे सुद्धा वाचा

मॉरीसच्या कार्यालयाच्या बाजूलाच अभिषेक यांचं कार्यालय आहे. काल मॉरीसने हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवला होता. महिलांना साड्या वाटप करण्यात येणार होतं. अभिषेक यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडावा म्हणून त्याने आदल्या दिवशी अभिषेक यांना फोन केला होता. काल तो अभिषेक यांना घेऊन आला. कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी त्याने त्याच्या कार्यालयात अभिषेक यांना नेलं. तिथे फेसबुक लाइव्ह केलं. यावेळी दोघांनीही जुने वाद मिटवून काम करण्याच्या आणभाकाही घेतल्या. अभिषेक यांचं बोलून झाल्यावर ते जागेवरून उठले आणि मॉरीसने हीच संधी साधून अभिषेक यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे अभिषेक यांचा मृत्यू झाला.

स्वत:लाही संपवलं

मॉरीस याने अभिषेक यांना मारल्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने त्याने स्वत:ला संपवल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून तपासातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.

मॉरीस अट्टल गुन्हेगार

मॉरीस हा अट्टल गुन्हेगार होता असं सांगितलं जात आहे. त्याच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि तिला लाखो रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. त्यामुळे तो मधल्या काळात तुरुंगातही होता. मॉरीसला नेता बनायची हौसही होती. त्यामुळे त्याने महापालिकेची निवडणूकही लढवली होती असं सांगितलं जातं. तो स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेत असल्याचंही सांगितलं जात आहे.