नाशिक : नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी केलेल्या कारवाई संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नवनियुक्त पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील जानोरीतील औद्योगिक वसाहतीत अवैध बायोडिझेल निर्मितीच्या कारखान्यावर पोलीसांनी धाड टाकत केलेल्या कारवाईनेचे कौतुक होत आहे. मात्र, हा अवैध कारखाना कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण पोलीस दलाचे सूत्रे शहाजी उमाप यांनी हाती घेतल्यानंतर ग्रामीण भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यातच दिंडोरी येथील कारवाईने तर ग्रामीण भागासह शहरी भागात ग्रामीण पोलीस प्रमुखांच्या कारवाईचा डंका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सुरू केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 21 संशयित ताब्यात घेण्यात आले असून 11 गुन्हे दाखल केले आहेत.
ग्रामीण पोलीस दलाच्या माध्यमातून एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे, त्यामध्ये अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांमार्फत कारवाई करण्यात येत असून नुकतीच दिंडोरी येथेही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील औद्योगिक वसाहतीत एका बायोडिझेल निर्मिती कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. एक कोटी रुपयांचे अवैध इंधन आणि पाच आरोपींना अटक केली आहे.
औद्योगिक वसाहतीत एका पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेलचा अवैध साठा असल्याची माहिती नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यावरून छापा टाकत कारवाई केली आहे. जिल्ह्यात गुन्हे शाखेच्या वतिने कारवाईचा धडाका लावला आहे.