केरळ : दोन प्रौढ जोडीदारांमध्ये संमतीने करण्यात आलेले लैंगिक संबंध (Sexual Relation) हे बलात्कार ठरू शकत नाहीत. अशा संबंधात आयपीसीच्या कलम 376 च्या कक्षेत येणार्या बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल केरळच्या उच्च न्यायालया (Kerala High Court)ने दिला आहे. जोपर्यंत फसवणूक करून लैंगिक संबंधासाठी संमती प्राप्त केल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत अशा लैंगिक संबंधांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या खंडपीठाने 29 वर्षीय वकिल नवनीत एन नाथला जामीन मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवले.
29 वर्षीय आरोपी वकिल नवनीत एन नाथ याने एका महिला वकिलाला लग्नाचे आश्वासन दिले होते. हेच आमिष दाखवून त्याने एका वकील महिलेवर विविध ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर लग्नाच्या आश्वासनातून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणातील फिर्यादीने आरोप केला की, आरोपीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. नाथ हा उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा स्थायी वकील आहे. त्याला 23 जून रोजी आयपीसी कलम 376(2)(एन) आणि 313 अंतर्गत अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात निकाल देताना केरळ उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण मते व्यक्त केली आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, “दोन प्रौढ जोडीदारांनी स्वतःच्या इच्छेने ठेवलेले लैंगिक संबंध भले विवाहात परावर्तित होत नसले तरीही त्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. दोघांनी परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवलेले असतील आणि जर नंतर लग्नास नकार देणे किंवा नातेसंबंध लग्नाच्या आड येणे हे प्रकार लग्न होऊ देत नसतील, तर आधीच्या शारीरिक संबंधांना बलात्कार ठरवता येणार नाही. लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावता येऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
– स्त्री आणि पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध केवळ स्त्रीच्या इच्छेविरुद्ध किंवा स्त्रीच्या संमतीशिवाय किंवा सक्तीने किंवा फसवणूक करून संमती मिळाल्यावरच बलात्कार ठरू शकतात.
– लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंधांना मिळवलेली संमती ही केवळ त्याचवेळी बलात्काराच्या रूपात असेल, ज्यावेळी वचन चुकीच्या विश्वासाने दिले गेले असेल किंवा फसवणूक केली गेली असेल किंवा शारीरिक संबंध ठेवण्याच्या वेळी त्या वचनाचे पालन करण्याचा हेतू नसेल.
– लग्नाच्या वचनाचे पालन न केल्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंधांचे बलात्कारात रूपांतर करण्यासाठी लैंगिक कृत्यात सहभागी होण्याचा निर्णय स्त्रीच्या वचनावर आधारित असणे आवश्यक आहे.
– बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितलेल्या वचनाने स्त्रीला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केलेले असावे. शारीरिक मिलन आणि लग्नाचे वचन यांच्यात थेट संबंध असणे आवश्यक आहे.