अंबरनाथ / निनाद करमरकर (प्रतिनिधी) : कौटुंबिक वादातून बापानेच आपल्या 11 वर्षाच्या मुलाची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह झोळीत भरुन नाल्यात फेकत असतानाच नागरिकांनी त्याला पाहिले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. अंबरनाथ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आनंद गणेशन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले.
आरोपी आनंद आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते. याच वादातून दोघे वेगळे राहतात. याच वादातून आनंदने आपल्या 11 वर्षाच्या मुलाची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह एका झोळीत घेऊन नाल्यात फेकण्यासाठी घेऊन गेला.
मृतदेह नाल्यात फेकत असतानाच स्थानिक नागरिकांनी त्याला पाहिले. नागरिकांनी त्याला पकडले आणि अंबरनाथ पोलिसांना याची माहिती दिली. अंबरनाथ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीला अटक केली.
आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. नेमके काय घडले की आरोपीने स्वतःच्या मुलाला संपवले, याबाबत पोलीस तपास करत आहेत.