अंबरनाथ : लग्नासाठी सतत तगादा लावणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना अंबरनाथमधील नेवाळी परिसारत घडली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह राहत्या घरातच टाकून पळून गेला. याप्रकरणी हिललाईन पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. हिललाईन पोलीस फरार झालेल्या आरोपीचा कसून शोध घेत होते. अखेर आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तब्बल दीड महिन्यांनी अटक केली आहे. लक्ष्मी तायडे असे हत्या करण्यात आलेल्या प्रेयसीचे तर वैभव देवकाते असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
लक्ष्मी तायडे हिचा आधीच विवाह झाला होता. मात्र यानंतर तिचे वैभव देवकातेशी अनैतिक संबंध जुळले. वैभवसोबत लग्न करण्यासाठी लक्ष्मी तिच्या नवऱ्याला सोडून त्याच्याकडे रहायला गेली होती.
लक्ष्मी सतत वैभवकडे लग्नाचा तगादा लावत होती. याच कारणातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अखेर लग्नाच्या तगाद्याला कंटाळून वैभवने लक्ष्मीची गळा आवळून हत्या केली. यानंतर मृतदेह घरातच टाकून आरोपी तेथून पसार झाला. मात्र पोलिसांनी कसून शोध घेत पोलिसांनी औरंगाबादमधून वैभवला बेड्या ठोकल्या.