अंबरनाथ : लग्नाला 12 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्यानं पतीनं पत्नीची डोक्यात मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथमधील ऑर्डनन्स इस्टेटमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हत्येप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नीतू कुमारी मंडल असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर रोनीत राज मंडल असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल हा पत्नी नीतू कुमारी मंडलसोबत वास्तव्याला होता. मूळचे बिहारमधील असलेल्या या दोघांचं 2011 साली लग्न झालं होतं. यानंतर 2016 साली रोनीतराज हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर म्हणून कामाला लागला. ऑर्डनन्स इस्टेटमधील एच 38 या स्टाफ क्वार्टरमध्ये हे दाम्पत्य राहायला होतं. त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ होत नसल्यानं नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रीटमेंटही सुरू होती. मात्र रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता.
रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केले होते. यानंतर जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले आणि वादातून त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचं सांगितलं आणि आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव रचला.
या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मात्र रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी सुरू केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासाता मृत नीतू कुमारी हिच्या पतीवरच पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. मात्र केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या व्यक्तीनं केलेल्या या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे.