धाकट्या भावाचं प्रेम मोठ्या भावासाठी इतकं घातक का ठरलं? असं काय घडलं की होत्याचं नव्हतं झालं?

| Updated on: Apr 09, 2023 | 12:15 AM

धाकट्या भावाचे मित्राच्या पत्नीसोबत कथित प्रेमसंबंध सुरु होते. मोठ्या भावाने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न त्यालाच घातक ठरला.

धाकट्या भावाचं प्रेम मोठ्या भावासाठी इतकं घातक का ठरलं? असं काय घडलं की होत्याचं नव्हतं झालं?
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: TV9 Network
Follow us on

चित्तूर : धाकट्या भावाच्या विवाहबाह्य संबंधावरून सुरु असलेला वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभियंता तरुणाला हकनाक स्वतःचाच प्राण गमवावा लागला. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. धाकट्या भावाला त्याच्या प्रेमप्रकरणात महिलेच्या पतीपासून धोका होता. भावाच्या जीवाला असलेला संभाव्य धोका ओळखून तरुणाने त्याला बंगळुरूला पाठवले आणि महिलेच्या पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता. दुर्दैवाने वादावर पडदा पडण्याऐवजी संतापलेल्या महिलेच्या पतीने मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचीच हत्या केली. नागराजू असे हत्या झालेल्या या तरुणअभियंत्याचे नाव आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील अनुपल्ले गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक; पाचवा आरोपी फरार

भावाच्या प्रेमसंबंधात हकनाक प्राण गमावलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेचा पती बी. रिपुंजय याच्यासह पी. जी. रेड्डी, ए. रमेश आणि ए. कुमार या अन्य तीन आरोपींना अटक केली आहे. तर पाचवा आरोपी चाणक्य प्रताप अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हत्या करून पळालेले आरोपी अनुपल्ले गावातील शिव मंदिराजवळ लपून बसले होते. त्याचवेळी पोलिसांनी झडप टाकून त्यांना अटक केली.

मृतदेह कारमध्ये टाकला आणि कार पेटवली!

आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी भयानक कट रचला होता. मुख्य आरोपी रिपुंजय हा नागराजूच्या काही विधानांमुळे चांगलाच संतापला होता. त्याच रागाने त्याने हत्येचा पूर्वनियोजित कट रचला होता. त्यानुसार नागराजूला खूप दारू पाजण्यात आली आणि तो दारूच्या नशेत धुंद झाल्यानंतर त्याची हत्या करून मृतदेह एका कारच्या पुढच्या सीटवर टाकण्यात आला. त्यानंतर अपघात झाल्याचे चित्र उभे करण्यासाठी ती कार पेटवून देण्यात आली आणि नंतर कार एका नदीत ढकलून दिली होती.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटनेचा उलगडा

नागराजूची हत्या करून कार पेटवण्यात आली, त्यावेळी त्या परिसरातील पादचाऱ्यांनी कार जळताना पहिले होते. त्यांनी कार जळत असतानाच व्हिडीओ बनवला होता. तसेच त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला होता. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांना त्या माध्यमातून हत्याकांडाचा उलगडा करणे शक्य झाले आहे. अधिक तपासादरम्यान हे हत्याकांड अभियंता नागराजूच्या धाकट्या भावाच्या प्रेमप्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले.

प्रेमसंबधामुळे मैत्री तुटली होती!

नागराजूचा धाकटा भाऊ पुरुषोत्तमचे मुख्य आरोपी रिपुंजयच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. हेच संबंध हत्याकांडाला कारणीभूत ठरले होते. वास्तविक रिपुंजय हा सुरुवातीला पुरुषोत्तमच्या हत्येचा कट रचण्याच्या तयारीत होता. पुरुषोत्तम आणि रिपुंजय हे दोघे चांगले मित्र होते. मात्र कथित प्रेमसंबंधावरून त्यांच्यात वाद झाले आणि त्यांची मैत्री तुटली.